विदर्भात मुसळधार पावसाचे संकेत
By Admin | Updated: July 14, 2014 23:44 IST2014-07-14T23:44:25+5:302014-07-14T23:44:25+5:30
विदर्भावर सार्वत्रिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून पुढील चार ते पाच दिवसांत १०० ते १५० मिलीमीटर पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही

विदर्भात मुसळधार पावसाचे संकेत
अमरावती : विदर्भावर सार्वत्रिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून पुढील चार ते पाच दिवसांत १०० ते १५० मिलीमीटर पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला; मात्र पाऊस न आल्याने नागरिक चिंतातूर झाले होते. मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली; मात्र पाऊस न आल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. त्यामुळे आता शेतकरी हताश होण्याच्या मार्गावर होते. मात्र सोमवारपासून शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून काही दिवस शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. गुजरात ते केरळ व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यांतच समुद्रावरील बाष्पाचा पुरवठा वाढल्याने ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विदर्भावर ढगाचा प्रभाव पावसाच्या रुपात बरसणार आहे. या चार ते पाच दिवसांमध्ये विर्द्भावर ढगांचा पुरवठा चागंल्या प्रकारे होणार असून सार्वत्रिक पाऊस पडणार आहे. त्यातच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच अमरावती, चांदुरबाजार, चांदूररेल्वे व अन्य काही ठिकाणी पाऊस बरसला आहे. (प्रतिनिधी)