वनोजा बाग (अमरावती) : सहा वर्षे गोडीगुलाबीने संसार करणाऱ्या महिलेची कर्ज मिळवून समृद्ध जीवनाचे स्वप्न दाखविणाऱ्या पतीने फारकतनाम्यावर स्वाक्षरी घेऊन दुसरीशी घरोबा केला. पती व संसार गमावलेल्या महिलेला त्याच्या कटाचा थांगपत्ताही लागला नाही. आता मात्र तिने पोलिसांत तक्रार देऊन न्यायाची अपेक्षा केली आहे. उमरी येथील माहेर असलेल्या महिलेसोबत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथे ही फसवणूक घडली. याची तक्रार तिने रहिमापूर पोलिसांत दिली. तथापि, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण दाबल्याचा आरोप तिने केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रूपाली हिचा विवाह सन २०१० मध्ये गावंडगाव येथील अमोल याच्याशी झाला. त्यांना ९ वर्षांची एक मुलगीदेखील आहे. त्यांचा संसार सुरळीत सुरू असताना अमोलला कृषिसेवा केंद्राच्या व्यवसायाकरिता लोन हवे होते. त्यासाठी फारकतनाम्यावर लोन घेतल्यास सबसिडी मिळत असल्याची बतावणी त्याने पत्नीला केली.
अमोल हा पत्नीसोबत चांगलाच वागत असल्याने तिने संसाराच्या फायद्यासाठी फारकतनाम्यासाठी होकार दिला. अमोलने तिला वकिलाकडे नेऊन फारकनाम्यावर स्वाक्षरी करवून घेतली. नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न करून घरात आणले. तेव्हा माझी फसवणूक का केली, असे विचारले असता, आता तू सर्व लिहून दिले आहे. त्यामुळे कुठेही गेली तरी माझे काहीच होणार नाही, असे त्याने रूपालीला सांगितले. त्यामुळे ती माहेरी रहायला आली. तिने रहिमापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मिळण्यासाठी तक्रार दिली असता, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण रफादफा केल्याचा तिचा आरोप आहे. एवढी मोठी फसवणूक होऊन संसार मोडला असतानाही व्यवस्था न्याय देत नसल्याने ती उपोषणालाही बसली. तिचे प्रकरण न्यायालयात देऊन न्यायव्यवस्थेकडून यावर निर्णय व्हावा, अशी तिची अपेक्षा आहे.
---------------------------
अर्जदाराने पाच लाखांपैकी एक रुपयाही मिळाला नसल्याचे सांगितले असले तरी कायदेशीर फारकतनमा झालेला आहे. तिला दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणामध्ये आम्ही काही करू शकत नाही.
- सचिन इंगळे, ठाणेदार, रहिमापूर पोलीस ठाणे