अमरावती मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:25+5:30

खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा-अमरावती हा मुख्य मार्ग आहे.

Sifting of Amravati road due to potholes | अमरावती मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

अमरावती मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

Next
ठळक मुद्देपरतवाडा शहरातही खड्डेच खड्डे : अपघात वाढले, अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : परतवाडा-अमरावती रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. चांदूर बाजार नाका ते आसेगावपर्यंत हे शेकडो जीवघेणे खड्डे बघायला मिळत आहेत.
नाका-रणबाबा-भूगाव-मेघनाथपूर दरम्यान या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून उसळून खाली पडण्याचेही प्रमाण वाढले आहे. सहा महिन्यांपासून हे खड्डे बघायला मिळत आहेत.
खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परतवाडा-अमरावती हा मुख्य मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी-नागरिकांची याच मार्गाने ये-जा आहे. तरीही हा रस्ता दुर्लक्षित आहे. अचलपूर तालुक्यात सामान्यांना अपेक्षित असलेली विकासकामे वेगाने व्हावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

चार कोटीचा खर्च
परतवाडा-अमरावती मार्गावर परतवाडा ते आसेगाव दरम्यान चार कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली. एवढ्या रकमेची कामेही त्या रस्त्यावर बघायला मिळत नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. आसेगावच्या पुलापासून तर दर्यापूर फाट्यापर्यंत झालेल्या कामात रस्त्याची एक बाजू तशीच अपूर्ण पडली आहे. त्यावरील डांबरीकरणाचा थरच गायब आहे. या रस्त्यावर आठ कोटींची कामे घेतल्याच्या दाखविण्याच्या प्रयत्नात बांधकाम विभाग आहे.

कंत्राटदराने ते खड्डे बुजवावेत, याकरिता पाठपुरावा करीत आहोत. रस्त्यावर आठ कोटींचे काम प्रस्तावित आहे. चार कोटींचे काम पावसामुळे थांबविण्यात आले. अमरावती रोड व परतवाडा शहरातून जाणाऱ्या रस्त्याची देखभाल दोन स्वतंत्र कंत्राटदारांकडे दिली आहेत.
- विजय वाट, उपविभागीय अभियंता, सां.बा.वि.

नाक कापले
परतवाडा शहरातून पुढे हाच रस्ता चिखलदरा, धारणीसह मध्य प्रदेश व अकोला-अकोटकडे जातो. या रस्त्यावर शहरातही जीवघेणे खड्डे पडले आहेत. जयस्तंभ आणि बैलजोडी चौक शहराचे नाक आहे. ते नाकच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी कापले आहे.

Web Title: Sifting of Amravati road due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.