घेराबंदी उठली; संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा मुहूर्त!
By Admin | Updated: February 13, 2016 00:01 IST2016-02-13T00:01:45+5:302016-02-13T00:01:45+5:30
दीड वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचारी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेले विश्रामगृहानजीकचे अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले.

घेराबंदी उठली; संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा मुहूर्त!
अनधिकृत फूडझोनवर बडगा : जि. प. कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास
अमरावती : दीड वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचारी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेले विश्रामगृहानजीकचे अतिक्रमण शुक्रवारी काढण्यात आले. त्याचवेळी जि.प. कर्मचारी वसाहतीच्या संरक्षण भिंतीचे बांधकामही सुरू करण्यात आले आहे.
‘जि.प. कर्मचाऱ्यांची वसाहत की फूडझोन?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने जि. प. पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानालगतच्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेने तत्काळ संरक्षणभिंतीच्या बांधकामाला मंजुरी देऊन कामाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास या भागात खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांसह चष्मे व्यावसायिक, रसवंती आणि चप्पल-बूट विकणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
भररस्त्यात दुचाकी पार्किंग
अमरावती : जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीला लागून खुल्या जागेवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनी अतिक्रमण केले होते. शिवाय येथे येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी भररस्त्यात उभ्या केल्या जात होत्या. तीन रांगामध्ये येथे अस्तव्यस्त वाहनांचे पार्किंग होऊनही जि.प. पदाधिकारी, पोलीस विभाग आणि महापालिकेने दुर्लक्ष चालविले होते. विशेष म्हणजे अतिक्रमणातही दुकाने लावण्यावरून येथे व्यावसायिकांमध्ये वाद होत होते. हा प्रश्न ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडला होता. (प्रतिनिधी)