व्यावसायिकांनी गिळले फुटपाथ
By Admin | Updated: April 28, 2016 00:08 IST2016-04-28T00:08:46+5:302016-04-28T00:08:46+5:30
अमरावती शहरात महानगरपालिकेने कोटयवधी रूपये खर्चुन पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार केले आहेत.

व्यावसायिकांनी गिळले फुटपाथ
पंचवटी चौकात हॉटेल मालकाची मनमानी : गाडगेनगर-कठोरा मार्गावर हातगाड्यांचे साम्राज्य
अमरावती : अमरावती शहरात महानगरपालिकेने कोटयवधी रूपये खर्चुन पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार केले आहेत. मात्र, अनेक व्यवसायिकांनी स्वत:ची खासगी मालमत्ता समजून या फुटपाथवरच दुकान थाटली आहेत. स्थानिक पंचवटी चौकातील रोशनी हॉटेल हे व्यापाऱ्यांच्या बेमुर्वतखोरधोरणाचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.
या हॉटेलच्या बाहेर फुटपाथवर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय केला जात आहे. हा प्रकार नियमबाह्य असून सुध्दा काम करताना महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात?, असा प्रश्न विचारला जात आहे. रोशनी हॉटेलनजीक एक पानटपरी आहे. तिने सुध्दा फुटपाथ व्यापलेला आहे. या फुटपाथवर चक्क हॉटेल्समधील टेबल ठेवले जातात आणि याचठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाते.
हॉटेलमध्ये नाश्ता, चहा पिण्यासाठी येणारे ग्राहक हॉटेलसमोर बेशिस्त पध्दतीने वाहने ठेवतात. त्यामुळे फुटपाथवर चालणे देखील कठीण होऊन जाते. अमरावती, नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे नेहमी मोठी वर्दळ असते. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. याठिकाणी खरे तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. सदर हॉटेल चालक दिवसाला हजारो रूपयांची कमाई करीत असल्याने ग्राहकांसाठी त्यांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करायला हवी. या हॉटेलच्या बाजूलाच मंगल कार्यालय आहे. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु चालण्यासाठी फुटपाथच नसल्याने पादचाऱ्यांची गळचेपी होत आहे.
इतकेच नव्हे तर गाडगेनगर ते कठोरा मार्गावर सर्वदूर अशीच स्थिती आहे. फळे, भाज्या विक्रेत्यांनी हे फुटपाथ गडप केले आहेत. या फुटपाथवर वाहन उभे करण्यासही लोकांना हे दुकानदार मज्जाव करतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न या मार्गावर नेहमीच ऐरणीवर असतो. फुटपाथ हे स्वत:च्या मालकीचेच असल्याच्या अविर्भावात हातगाडीधारक येथे गाड्या उभ्या करतात. महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी या हातगाडी धारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.