शहीद कृष्णाची शौर्यगाथा चेतविते स्फुल्लिंग
By Admin | Updated: July 26, 2015 00:43 IST2015-07-26T00:43:38+5:302015-07-26T00:43:38+5:30
कारगील युद्धात शहीद झालेल्या कृष्णा समरित यांच्या शौर्यगाथा आजही स्फुल्लिंग चेतवितात.

शहीद कृष्णाची शौर्यगाथा चेतविते स्फुल्लिंग
कारगील विजय दिवस : वऱ्हा गावाची उंचावली मान
लोकमत दिन विशेष
गजानन मोहोड अमरावती
कारगील युद्धात शहीद झालेल्या कृष्णा समरित यांच्या शौर्यगाथा आजही स्फुल्लिंग चेतवितात. तिवसा तालुक्यामधील वऱ्हा गावात जन्मलेल्या निधड्या छातीच्या कृष्णा समरित या जवानाने कारगील युध्दात देशासाठी प्राणांची आहुती दिली. युवकांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशीच त्याची शौर्यगाथा आहे. त्यांच्या वीर मरणाने वऱ्हा गावाची मान उंचावली आहे.
३० जानेवारी १९६४ साली वऱ्हा गावात जन्मलेला कृष्णा समरित वयात येताच भारतीय सैन्यात दाखल झाला. शत्रुने घुसखोरी करून देशाच्या सीमेवर तळ ठोकले होते. सैन्यदलातून त्याच्या सेवानिवृत्तीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना कारगील युद्धाला सुरुवात झाली. या युध्दात २७ जुलै १९९९ ला जम्मू-काश्मीरच्या नवशेरा सेक्टरमध्ये कृष्णा समरित शहीद झाले.
देशाच्या संरक्षणाची भावना नसानसात भिनलेल्या कृष्णाने शत्रूवर हल्ला चढविला. शत्रुचे चारही दिशेने पानिपत होत असताना एका गोळीने घात केला. त्या गोळीने कृष्णाच्या काळजाचा ठाव घेतला. याच रणांगणावर तो देशासाठी शहीद झाला होता. ३० जुलै १९९९ रोजी ही वार्ता तहसीलदारामार्फत कृष्णाच्या घरी पोहोचली. दोन दिवसांनंतर शहीद कृष्णाचे पार्थीव वऱ्हा गावात आणण्यात आले.
या शहिदाला मानवंदना देण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक वऱ्हा गावात दाखल झाले होते. वरूणराजाही अधूनमधून बरसत त्याला जणू मानवंदनाच देत होता. गावातील प्रमुख मार्गावरून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याच्या सहकाऱ्यांनी शहीद कृष्णाच्या शौर्यगाथा सांगून बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. वऱ्हावासीयांची छाती गर्वाने फुलली, अशी त्याची शौर्यगाथा होती. त्यामुळेच वऱ्हा गावाच्या प्रमुख रस्त्याचे ‘शहीद कृष्णा समरित मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.
शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या कृष्णाचे पितृछत्र अगोदरच हिरावले होते. आई समवेत तो वऱ्हा येथे झोपडीवजा घरात राहायला होता. देश रक्षणार्थ सैन्यात असताना त्याच्या आई समवेत पत्नी, लहानगा मुलगा होता. तो शहीद होण्यापूर्वी त्याची पत्नी सविता गरोदर होती. पाच भावंडापैकी कृष्णा हा दुसऱ्या क्रमांकाचा. सध्या वऱ्हा या गावात कृष्णाचे तीन भाऊ राहतात. ते शेतमजुरी करतात. कृष्णाची पत्नी सविता हिला शासनाने विशेष बाब म्हणून उदरनिर्वाहासाठी पेट्रोलपंप दिला. ती आता आपल्या दोन मुलासह पूलगाव येथे भावाचा आधार घेऊन राहते. देशप्रेमाचे, मूर्तिमंत प्रतिक असणारा कृष्णा समरित आज खऱ्या अर्थाने युवकासाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरला आहे.
वीरपुत्राचा होतो गौरव
वऱ्हा येथे प्रमुख रस्त्याला शहीद कृष्णा समरित मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या शूरवीराचे स्मरण राहावे याकरिता ग्रामपंचायत द्वारा सांस्कृतिक भवनाचे निर्माण करण्यात आले. वऱ्हा गावासह तिवसा तालुक्यात प्रत्येक राष्ट्रीय सत्रासोबतच अन्य महत्वाच्या दिवशी या शहीद पुत्राचे गौरवाने स्मरण करण्यात येते.
जिल्ह्यातील एकमेव कारगील शहीद
जिल्ह्यात साधारणपणे चार हजार माजी सैनिक व दीड हजार सैनिकांच्या विधवा पत्नी आहे. साधारणपणे पाच हजार व्यक्तींना जिल्हा सैनिक कार्यालयाकडून आर्थिक लाभ, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा दिल्या जातात. कारगील युद्धात जिल्ह्यातील एकमेव शहीद म्हणून कृष्णा समरित याची नोंद आहे.
जिल्ह्यात कार्यक्रम
शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार २६ जुलै रोजी १६ वा कारगील विजय दिवस हा जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शहिदांना आदरांजली त्यांच्या वारसांना सन्मानित करून आर्थिक मदतीचे धनादेश ना. प्रवीण पोटे, ना. रणजीत पाटील यांचे हस्ते देण्यात येणार आहे.