ग्रामसेवक दाखवा अन् पाचशे रुपये मिळवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:15+5:302021-03-16T04:14:15+5:30
फोटो पी १५ खडीमल चिखलदरा : आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस ...

ग्रामसेवक दाखवा अन् पाचशे रुपये मिळवा !
फोटो पी १५ खडीमल
चिखलदरा : आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे पोस्टर खडीमल ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर चिटकविण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांनी ते लावल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, खडीमल ग्रामपंचायतीचे सचिव वाय.जी. जाधव हे सतत गैरहजर राहतात. १५ दिवसांपासून ते गावात फिरकलेच नाही. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुनखडी गावात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामसेवक गावात नसल्याने सध्या गावकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जाधव हे ग्रामपंचायतीत पहिल्यांदा रुजू झाले, तेव्हापासूनच विविध मिटिंगचे कारण देऊन गैरहजर राहतात. मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानासुद्धा हे कधीच गावात मुक्कामी राहत नाही. सध्या गावातील अडचणी कुणासमोर मांडाव्यात, हा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व चिखलदरा खंडविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याकडे करण्यात आली. जाधव यांच्यावर कारवाही करावी, अशी मागणी सरपंच तुलसी कास्देकर, सोमाजी धिकार, सुकराम सावजी, कुसूम अलोकार या ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
बॉक्स
मेळघाटातील हीच गंभीर समस्या
ग्रामसेवकांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याचे शासकीय आदेश असले तरी मोठ्या प्रमाणात ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी कुठे खर्च होतो. याचासुद्धा हिशेब नाही. परस्पर बिले जोडून रक्कम काढल्याचा प्रकार नेहमीचाच आहे. संबंधित ग्रामसेवकांचे वेतन काढण्यासाठी सरपंच दाखल्याची आवश्यकता असताना बेपत्ता ग्रामसेवकांवर कारवाईची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.
कोट
शुक्रवारी शासकीय कामानिमित्त संबंधित ग्रामसेवक एका बैठकीला उपस्थित होते. संबंधित आदिवासींच्या समस्या तात्काळ ग्रामपंचायतीला जाऊन निकाली काढण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
- प्रकाश पोळ,
बीडीओ, चिखलदरा
------------