भाजीबाजार येथील दारु विक्रीच्या दुकानाला टाळे
By Admin | Updated: May 23, 2015 00:46 IST2015-05-23T00:46:02+5:302015-05-23T00:46:02+5:30
नियम गुंडाळून येथील भाजीबाजारातील नागरी वस्तीत सुरु असलेल्या देशी दारुविक्रीच्या दुकानाला शुक्रवारी अखेर टाळे ..

भाजीबाजार येथील दारु विक्रीच्या दुकानाला टाळे
महिलांचा एल्गार : राणांच्या नेतृत्वात आंदोलन
अमरावती : नियम गुंडाळून येथील भाजीबाजारातील नागरी वस्तीत सुरु असलेल्या देशी दारुविक्रीच्या दुकानाला शुक्रवारी अखेर टाळे लावण्यात आले. आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात दारुबंदी आंदोलनात परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी ढोल ताशांचा गजर, कायमस्वरुपी दारुबंदी झालीच पाहिजे, या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होताच भाजीबाजारात दारुबंदीच्या मागणीने जोर धरला. या भागातील महिलांनी एम. जे. गुल्हाणे यांचा परवाना असलेल्या भाजीबाजारातील देशी दारुविक्रीचे दुकान या परिसरातून कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी केली. दारुबंदीसाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ. रवी राणा, राज्य उत्पादक शुल्क विभागाला निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी गित्ते यांनी एक्साईजला या देशी दारुविक्री दुकानासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २८ एप्रिल रोजी एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी या दारुविक्री दुकानाबाबत असलेल्या तक्रारींची मोजणी वजा शहनिशा केली. या दारु विक्री दुकानापासून दवाखाना, लोकवस्ती, शाळा, भाजीबाजार अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
भाजीबाजार परिसरात असलेल्या दारु विक्रीच्या दुकानाविरुद्ध आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात महिलांनी आंदोलन केले. परिस्थिती चिघळू नये, यासाठी तूर्तास या दुकानाला टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील कार्यवाही कशी करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.
- शरद लांडगे,
प्रभारी अधीक्षक, एक्साईज विभाग.