पणन महासंघाचे केंद्र कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: March 13, 2017 00:06 IST2017-03-13T00:06:25+5:302017-03-13T00:06:25+5:30
कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून ...

पणन महासंघाचे केंद्र कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत
हमीभावात वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावे : चार महिन्यांत एकही शेतकरी फिरकला नाही!
अमरावती : कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून पणन महासंघाच्या जिल्हाभरातील केंद्रावर गत चार महिन्यापासून एकही शेतकरी फिरकला नाही. जिल्ह्यात केंद्रावर उद्घाटनापासून एकरी किलो कापसाची खरेदी सुद्धा गत चार महिन्यापासून झाली नाही.
पणन महासंघापेक्षा खुल्या बाजारात कापसाला मिळणारा भाव जास्त असल्याने ही परिस्थिती पणन महासंघावर ओढवली आहे. शेतमाल उत्पादक खर्च व शेतमाल तयार झाल्यानंतरही विक्रीपर्यंतचा खर्च याचा हिशेब केल्यास शेतमालास मिळणारा हमीभाव कमीच आहे. त्यातच इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्तच असते. मात्र खर्च वाढला असताना दरवर्षी नगण्य अशी फक्त ५० रूपये प्रति क्विंटल हमीभावात वाढ होत आहे. आज रोजी पणन महासंघाकडून सर्वात उच्च प्रतिच्या कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल असा हमीदर दिला जात आहे. कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी हमीदराने कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. तसेच या केंद्रावरील आवक पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होती. मात्र या केंद्रावर गत चार महिन्यांपासून एकाही शेतकऱ्याने आपला कापूस विकण्यासाठी आणला नाही. परिणामी या केंद्रावर गत चार महिन्यात एक किलोही कापूस खरेदी झाला नाही. उद्घाटनालाही सुद्धा या केंद्रावर कापूस नव्हता उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीदरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने विकण्यापेक्षा घरात पडून असलेला बरा अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे. हमीभावात कापूस मिळत नसल्याने जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असताना देखील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना हमी दरापेक्षा जास्तच भाव देऊन कापसाची खरेदी करावी लागत आहे त्यामुळे खुल्या बाजारात आजमितीला कापूस ५५०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटलने विकल्या जात आहे. पणन महासंघाचे भाव कमीच आहेत. अल्पभूधारकांनी कापूस पीक लागवडीला फाटा दिला तर सधन व बागायती शेतकऱ्यांकडूनच कापसाची लागवड केली जात आहे. परिणामी कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याची ही ओळख हळूहळू संपत आहे. शासनाने उत्पादन खर्चाचा विचार करता कापसाचे हमीदर वाढवावे, अशी मागणी आहे.
जिल्ह्यात पाच केंद्र
कापूस पणन महासंघाचे जिल्ह्यात पाच कापूस खरेदी केंद्र आहेत. यामध्ये तिवसा, वरूड, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आदी ठिकाणी सध्याही कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र मागील नोव्हेबर महिन्यापासून या पाचही ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर काटा पूजनावरच खरेदी केंद्र स्थिरावले आहेत. मात्र कापूसाचा बोंडही विक्रीस आला नाही.
पणन महासंघाची पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्र आहेत. मात्र केंद्र सुरू झाल्यापासून कापूस विक्रीला आलाच नाही. कारण शासकीय दरापेक्षा खासगीकडे अधिक भाव मिळत आहे. त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असल्याचे समाधान आहे
- छाया दंडाळे,
संचालक पणन महासंघ