बळीराजाला प्रतीक्षा एकाधिकार कापूस खरेदीची
By Admin | Updated: November 4, 2014 22:33 IST2014-11-04T22:33:56+5:302014-11-04T22:33:56+5:30
राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे.

बळीराजाला प्रतीक्षा एकाधिकार कापूस खरेदीची
अमरावती : राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३६०० ते ३८०० रूपये दिले जात आहेत. शासनाने लांब स्टेपलच्या कापसाला चार हजार रूपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी कशी सुरू होणार याची बळीराजाला प्रतीक्षा आहे.
शहरातील खासगी जिनिंगवर अद्यापही कापसाची आवक सुरू झालेली नाही. शहरात असलेल्या विविध जिनिंगवर मागील वर्षी ५ हजार कापसाच्या गाठीचे उत्पादन करण्यात आले होते. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासनाकडून कापूस खरेदी योजना सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैश्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून निघालेला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला जात आहे. कापसाची अद्याप वेचणी सुरूच आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी उशीरानेच सुरू केली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेरणी उशिरा झाली. कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. तसेच मागील वर्षी दिवाळीही नोव्हेंबर महिन्यात आल्याने कापूस खरेदीचा शुभारंभ दिवाळीलाच करण्यात आला होता. परंतु यावर्षी दिवाळी आॅक्टोबरमध्ये आल्याने कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून सुरू झाली आहे. तर काही भागात कापूस काढून झाला आहे. तरी कापसाचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकरी करत आहे. अमरावती जिल्ह्यात अद्याप तरी कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडीया अर्थात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला प्रति क्विंटल ४५०० रूपये हमी भाव देण्यात येणार आहे.
शासनाचे कापूस खरेदीबाबतचे धोरण अद्यापही स्पष्ट झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी शासकीय विक्री केंद्रे उपलब्ध झाली नाहीत. परिणामी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी नाईलाजाने कापूस व्यापाऱ्यांना विकून आपले आर्थिक व्यवहार शेतकऱ्यांना भागवावे लागत आहे. (प्रतिनिधी)