शिलेदारांनो, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत बोला !

By Admin | Updated: December 13, 2014 00:38 IST2014-12-13T00:38:16+5:302014-12-13T00:38:16+5:30

संत्र्याच्या आंबट-गोड चवीमुळे चांदूरबाजार, वरूड, मोर्शी परिसरातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. परंतु या संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग जिह्यात साकारला नाही.

Sholdars, talk about the orange processing project! | शिलेदारांनो, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत बोला !

शिलेदारांनो, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत बोला !

सुरेश सवळे अमरावती
संत्र्याच्या आंबट-गोड चवीमुळे चांदूरबाजार, वरूड, मोर्शी परिसरातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. परंतु या संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग जिह्यात साकारला नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील संत्रा उत्पादक शेतकरी नाडला जात आहे. आता तर जिल्ह्यात सत्तारुढ बाकावर बसणारे आठपैकी तब्बल चार आमदार आहेत. विशेष म्हणजे विधान परिषदेत निवडून आलेले भाजपच्या आमदारांच्या गळ्यात तर चक्क उद्योग राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. विधानसभेतील चार सत्तारुढ आमदारांसह दोन अपक्ष व दोन काँग्रेसच्या आमदारांनी आता तरी जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत आपला आवाज रेटून धरणे गरजेचे आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या प्रक्रिया उद्योगासाठी ठोस असा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी केल्यास जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. राज्यात १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. त्यापैकी अंदाजे १ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशीम, बुलडाणा भागात विखुरलेले आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी व अचलपूर या तालुक्यात ७५ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. जिल्ह्यातील उद्योगाचा आढावा घेता येथे द्राक्ष, केळीचेसुद्धा उत्पादन घेतले जात होते. परंतु बाजारपेठ व योग्य वातावरण न मिळाल्यामुळे शेतकरी संत्र्याकडे वळला. संत्र्यामुळे दरवर्षी हजारो हातांना काम देणारी बाजारपेठ या ठिकाणी निर्माण झाली. संत्रा कलमापासून बहुगुणी संत्रा परप्रांतीय बाजारपेठेत पोहचला. संत्रा उत्पादन लक्षात घेता शासनाने मोर्शी-वरूड परिसरात संत्रा प्रक्रिया उद्योगाला मंजुरात दिली. परंतु लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या परिसरातील फळ प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातून पळविला. परिणामी जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे हाल झाले.
अमरावती जिल्ह्यात ३१ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. विदर्भातील ५ लाख टन संत्रा उत्पादनापैकी अडीच लाख टन संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यात घेतले जात आहे. जिल्ह्यात मोर्शी-वरूड परिसरात १८ एकर परिसरात एक विशाल सरकारी संत्रा नर्सरी आहे. या नर्सरीतून चांगल्या व उच्च प्रतीच्या संत्रा कलमा पुरविण्यात येतात. परंतु या नर्सरीत संत्रा पिकाशी संबंधित अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, मार्गदर्शन व्यवस्था उभारणीची गरज आहे. संत्रा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असताना संत्र्याचे उत्पादन व दर्जा वाढीचा विचार होणे गरजेचे आहे. संत्र्यावर प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे यावर्षी कधी नव्हे इतके संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. संत्र्याची उचल व भाव नसल्यामुळे कमी प्रतीचा संत्रा अक्षरश: रस्त्यावर फेकला जात आहे.
संत्र्याची दैना :
अमरावती जिल्ह्यात संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग निर्माण झाल्यास बहुगुणी संत्र्याला उभारी मिळू शकेल. संत्रा टिकवून ठेवण्यासाठी शीतगृह, दळणवळणाची सुविधा आणि संत्रा प्रक्रिया केंद्र असल्यास पुन्हा संत्र्याला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. संत्र्याच्या गोड-आंबट अशा स्वादिष्ट चवीमुळे विदर्भातील संत्रा, मोसंबी उत्पादनातून २ हजार ५०० ते ३ हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. लाखो कुशल, अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. गुणकारी संत्रा देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठेमध्येसुद्धा पोहचला आहे. परंतु शेतात राबराब राबून नैसर्गिक संकटेसुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे.
संत्रा व्यवसायातून हजारो हातांना काम
जिल्ह्यात सिंचनाखाली असणारे मोठे क्षेत्र संत्र्याचे आहे. या व्यवसायातून मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. इतकेच नव्हे, तर या व्यवसायात आदिवासी मजूर मोठ्या संख्येने राबत असतात. संत्रा उत्पादनाच्या मोसमात परप्रांतीय शेकडो व्यापारी संत्रा खरेदीसाठी अमरावती जिल्ह्यात डेरेदाखल असतात. येथून परप्रांतात संत्रा विक्रीसाठी नेला जातो. येथील संत्रा परप्रांतीय बाजारपेठेतसुद्धा आपले स्थान टिकवून आहे.

Web Title: Sholdars, talk about the orange processing project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.