प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने षोडशीची आत्महत्या
By Admin | Updated: April 9, 2016 00:01 IST2016-04-09T00:01:48+5:302016-04-09T00:01:48+5:30
कुटुंबीयांसमोर प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने षोडशीची आत्महत्या
महेंद्र कॉलनीतील घटना : मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी जप्त
अमरावती : कुटुंबीयांसमोर प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी महेंद्र कॉलनी परिसरात उघडकीस आली. मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून त्या चिठ्ठीतून आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झाला आहे.
मृत मुलगी महेंद्र कॉलनीत दोन बहिणी व आईसोबत राहत होती. तिचे विजय धोत्रे (२७, रा. महेंद्र कॉलनी) याचेसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान गुरूवारी मृत मुलीच्या मधल्या बहिणीचा आरोपी विजय विश्वनाथ धोत्रे याचेसोबत वाद झाला. विजय हा लहान बहिणीची नेहमीच छेड काढतो, असे मृताच्या दोन्ही बहिणींचे म्हणणे होते. त्यामुळे दोन्ही बहिणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द तक्रार नोंदविण्यास गेल्या. त्यावेळी लहान बहीण घरी एकटीच होती. पोलिसांनी दोन्ही मुलींच्या तक्रारीच्या आधारे विजय धोत्रेविरुध्द भादंविच्या कलम ३५४ व पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आणि अटकही केली. ही बाब षोड्शीला कळताच आता आपले प्रेमप्रकरण कुटुंबीयांसमोर उघडकीस येणार, या भीतीने तिने घरातच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी मृत मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.
चिठ्ठीत तिने विजयशी प्रेमसंबंध असल्याचे नमूद करून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले आहे. त्यामुळे प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)