मिनिमंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये पीआरसी दौऱ्याची धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST2021-09-15T04:17:25+5:302021-09-15T04:17:25+5:30
अमरावती : राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीचा दौरा १३ सप्टेंबर रोजी मिनीमंत्रालयात धडकला. आगामी ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान २५ ...

मिनिमंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये पीआरसी दौऱ्याची धडकी
अमरावती : राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीचा दौरा १३ सप्टेंबर रोजी मिनीमंत्रालयात धडकला. आगामी ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान २५ सदस्य असलेल्या आमदारांची ही समिती जिल्हा परिषदेत दाखल होणार आहे. या समितीच्या दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा खडबडून जागे होत कामाला लागली आहे.
आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील विधिमंडळाची पंचायतराज समिती ६ ऑक्टोबर रोजी दाखल होत आहे.या समितीत आमदारांसह विधानसभा व विधान परिषदेच्या सचिवांचाही समावेश आहे. पीआरसी समितीचा जिल्हा दौरा निश्चित होताच. समिती भेटी दरम्यान सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण केले जाणार आहे. यासाठी समितीस पाठविलेली माहिती पुस्तिकेत संबंधित प्रश्न, लेखा आक्षेपात ज्या शासन निर्णय, परिपत्रके आदी माहिती तयार ठेवण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले आहे.त्यामुळे मिनीमंत्रालयाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.
बॉक्स
असा आहे पीआरसी दौरा
६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत जिल्ह्यातील विधानमंडळ सदस्यांशी औपचारिक चर्चा, ११ ते ११.३० दरम्यान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा, ११.३० वाजता २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील अमरावती जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदातील मुख्यकार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.
७ ऑक्टोबरला १० वाजेपासून पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. शाळा व ग्रामपंचायतींना भेटी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमाक २ च्या संदर्भात साक्ष, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पासून जि.प.च्या सन २०१७-१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.
बॉक्स
सीईओंनी घेतली खातेप्रमुखांची बैठक
पंचायत राज समिती दौरा धडकताच जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने १४ सप्टेंबर रोजी आपल्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समितीने पाठविलेल्या पत्रानुसार सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण केले जाणार आहे. याकरिता समितीस पाठविलेली माहिती पुस्तिकेत संबंधित प्रश्न, लेखा आक्षेपात ज्या शासन निर्णय, परिपत्रके याबाबतची माहिती तयार ठेवण्याबाबत सूचना सीईओंनी दिल्या. बैठकीला सर्वच खातेप्रमुख उपस्थित होते.