अपात्र मतदार यादीबाबत शेखर भुयार यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:39+5:302021-01-04T04:11:39+5:30
अमरावती : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून पात्र नसतानाही मतदार यादीत शिक्षकांची बनावट नावे मतदार ...

अपात्र मतदार यादीबाबत शेखर भुयार यांची तक्रार
अमरावती : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून पात्र नसतानाही मतदार यादीत शिक्षकांची बनावट नावे मतदार यादीत समाविष्ट करणाऱ्या नारायणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी रविवारी केली. याच आशयाची तक्रार रविवारी राजापेठ पोलीस ठाण्यात केली.
भारत निर्वाचन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा ( रिप्रझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५०) च्या भाग (२७) (ब) नुसार शिक्षक मतदारसंघातील मतदानास पात्र असलेल्या मतदारांची पात्रता नमूद केली आहे. त्यानुसार त्या मतदाराने अथवा शिक्षकाचे प्रश्न शासनाशी निगडित असले पाहिजे, तो माध्यमिकपेक्षा (सेंकडरी लेव्हल) कमी दर्जाचा नसावा, असे नमूद केले आहे. परंतु, विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये नारायणा विद्यालयातील मतदार म्हणून पात्र नसलेल्या शिक्षकांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये नारायणा विदयालयामधील ३६ शिक्षकांची नोंदणी मतदार यादीत झाल्याचा आरोप भोयर यांनी केला.
बॉक्स
हा निवडणूक कायद्याचा भंग
मतदार म्हणून तहसील कार्यालयामध्ये नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठी सदर शाळेच्या मुख्याध्यापकाचे स्वाक्षांकन व प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे. यामध्ये सदर मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक अपात्र शिक्षकांची नावे मतदार यादीमध्ये दाखल केलेली आहेत. हा निवडणूक कायद्याचा भंग असून, सदर प्रकरणाची चौकशी करून मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भोयर यांनी केली आहे.