लाडक्या ‘परी’साठी ती जिंकली शर्यत
By Admin | Updated: March 31, 2017 00:14 IST2017-03-31T00:14:46+5:302017-03-31T00:14:46+5:30
दारिद्र्यातून मार्ग काढत घेतलेले शिक्षण. विवाहानंतर सर्व ठीक होईल, असा आशावाद; तथापि मुलीच्या जन्मानंतर अचानक पतीने केलेला त्याग.

लाडक्या ‘परी’साठी ती जिंकली शर्यत
एका आईची कहाणी : मुलीच्या जन्मामुळे पतीने ठरविले गुन्हेगार
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
दारिद्र्यातून मार्ग काढत घेतलेले शिक्षण. विवाहानंतर सर्व ठीक होईल, असा आशावाद; तथापि मुलीच्या जन्मानंतर अचानक पतीने केलेला त्याग. तरीही केवळ जिद्द अन् उमेदीच्या बळावर विपरीत परिस्थितीवर मात करणाऱ्या एका मातेचा दुर्दम्य आत्मविश्वास विजयी झाल्याचा अविस्मरणीय क्षण धामणगाववासीयांनी प्रीती कुंभरे हिच्या रुपाने नुकताच अनुभवला.
अमरावती येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये सव्वा वर्षाच्या मुलीसह आलेल्या प्रीती कुंभरे हिने मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करून शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकली. एकीकडे ध्येयासाठी जीव तोडून धावणे, तर दुसरीकडे चिमुकलीच्या रडण्याने हेलकावणारे मन, असा भावविव्हळ प्रसंग पोलीस बांधव व स्पर्धकांनी गत शनिवारी अनुभवला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथील २४ वर्षीय प्रीती पांडुरंग कुंभरे या आदिवासी महिलेची ही कहाणी आहे़ पॉलिटेक्निकमधून दूध डेअरीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास तिने बाळगला होता. मात्र, प्रीतीचा विवाह २०१४ साली कारंजा येथील युवकाशी झाला. लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या प्रितीला मुलगी झाली. यामुळे पत्नी व मुलीकडे पतीने पाठ फिरविली. सव्वा वर्षापासून पतीने एकदाही मुलीचा चेहरा पाहिला नाही़ प्रितीने मात्र मुलीचे नाव परी ठेवले. ती आपल्या जीवनात बदल घडवेल असाच विश्वास तिला असावा. लाडक्या ‘परी’साठी पोलीस भरतीत सामील झाली. शनिवारी पोलीस भरतीत तिने शंभर मीटर धावण्याची चाचणी जिंकली. पश्चात तिची आठशे मीटर चाचणीसाठी निवड झाली.यापूर्वी तिने मुलीला महिला पोलिसांनी सांभाळावे, अशी विनंती केली. मात्र, ‘परी’ला आई न दिसल्याने ती रडू लागली. तिच्या मातृत्वाची नजरही वारंवार परीवरच होती. अशा परिस्थितीत तिने शर्यतीत विजय मिळविला. तिच्या मातृत्वाला आणि जिद्दीला सलाम.