लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीला प्रेमाचा मजकूर असलेली चिठ्ठी देण्यात आली. त्यापूर्वी देखील आरोपीने त्या १४ वर्षे ११ महिने वयाच्या त्या मुलीचा पाठलाग चालविला होता. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी रात्री १२च्या सुमारास संजय मारुती उईके (३०, रा. सालबर्डी) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
मोर्शी तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली शाळकरी विद्यार्थिनी त्याच तालुक्यातील अन्य एका गावातील शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास ती शाळेच्या गेट बाहेर उभी होती. त्यावेळी आरोपी संजय हा त्याच्या दुचाकीवरून तेथे आला. त्याने तिला संजय व तिचे नाव लिहिलेले दोन 'हार्ट शेप' दिले. त्या बाजूला 'तुम मेरे लिए पुरी दुनिया हो, मैं तुम्हे बहुत याद करता हूं, परी लग रही हो,' अशा मजकुराची चिठ्ठी दिली. या अकल्पित घटनेने ती शाळकरी विद्यार्थिनी चांगलीच भेदरली. तातडीने घर गाठून तिने तो प्रकार पालकांना सांगितला. पालकांनीदेखील तातडीने मोर्शी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पुढील तपास परिविक्षाधीन पीएसआय चव्हाण हे करीत आहेत.