‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून
By Admin | Updated: March 6, 2017 00:03 IST2017-03-06T00:03:18+5:302017-03-06T00:03:18+5:30
अनैतिक संबंधातून मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघड झाली.

‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून
आरोपी अटक : पोहरा मार्गावरील घटनेचे गूढ उकलले
अमरावती : अनैतिक संबंधातून मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघड झाली. पोहरा मार्गावरील बीएसएनएल टॉवरनजीक ३ मार्च रोजी कुचलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. या हत्येचे छडा गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून त्यांनी आरोपी नीलेश सहारे (रा.नवसारी) याला अटक केली आहे.
फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील सलामे यांच्या शेतात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला. मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान गुन्हे शाखा व सायबर सेलने तपासाची सूत्रे हाती घेऊन तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून मृताची ओळख पटविली. अनिल रामचंद्र चौधरी (रा. बालाघाट) असे मृताचे नाव असून तो जालना येथील गणेश ट्रस्ट येथे कामाला असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पुढील चौकशी करून मृतक अनिल चौधरी हा अमरावतीमधील त्याचा मित्र निलेश सहारेला १ मार्च रोजी भेटायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी निलेश सहारेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या पत्नीशी अनिल चौधरीचे अनैतिक संबंध होता.
२४ तासांच्या आत छडा
अमरावती : एके दिवशी अनिल त्याच्या पत्नीसोबत आपत्तीजनक स्थितीत आढळल्यावर त्याचा राग अनावर झाला होता. त्यावेळी त्याने अनिल चौधरीला संपविण्याचा बेत आखला. दरम्यान आरोपी नीलेश सहारेने मालखेड तलावावर जाण्याची कल्पना आखून अनिल चौधरीला सोबत घेतले. त्याने त्याच्याजवळ चाकू घेतला. दोघेही मालखेड तलाव येथे जाऊन परत येत असताना आरोपी निलेशने अनिलला पोहरा मार्गावरील बीएसएनएल टॉवरजवळील हनुमान मंदिराजवळ नेले. त्या ठिकाणी अनिलवर चाकुने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची कबुली नीलेशने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी नीलेश सहारेला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट करीत आहे. हत्या प्रकरणात मृताचा चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, गुन्हे शाखा व सायबर सेलने या हत्या प्रकरणाचा तांत्रिक व शास्त्रोक्त पध्दतीने तपास करून २४ तापास उलगडा केला.
पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, सायबर सेलचे अनिल गवंड, पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, पोलीस हवालदार दिपक श्रीवास, पोलीस कॉन्स्टेंबल सुभाष पाटील, विनय मोहोड, अमर बघेल, इम्रान सय्यद, उमेश कापडे, महादेव कासदेकर, मनीष गवळी, चालक राजेश बहिरट, संतोष रौराळे यांनी हा गुन्हा उघड केला. (प्रतिनिधी)