हमालपुरा खून प्रकरणातील धारदार शस्त्र जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:09 IST2021-07-05T04:09:41+5:302021-07-05T04:09:41+5:30
अमरावती : जुन्या वैमनस्यातून धारदार चाकूने भोसकून एका युवकाची हमालपुऱ्यातील करण बारनजीक १ जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. ...

हमालपुरा खून प्रकरणातील धारदार शस्त्र जप्त
अमरावती : जुन्या वैमनस्यातून धारदार चाकूने भोसकून एका युवकाची हमालपुऱ्यातील करण बारनजीक १ जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले धारदार शस्त्र सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या हमालपुरा येथील मामाच्या घरून रविवारी सकाळी जप्त केले. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची पोलीस कोठडी ५ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे.
प्रमोद अशोक वाडेकर (२६, रा. आदिवासी कॉलनी) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश प्रकाश वलन (२२, रा. आदिवासी कॉलनी) या युवकाची प्रमोदने चाकू भोसकून हत्या केली होती.
पोलिसांनी यापूर्वी आरोपीचे व मृताचे कपडे जप्त केले होते तसेच एक दुचाकीसुद्धा जप्त केली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आकाशने प्रमोदच्या मांडीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्याच्या मांडीला गंभीर इजा झाली होती. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकाशविरुद्ध भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासूनच प्रमोदच्या मनात राग धुमसत होता. आकाशला संपविण्याच्या संधीची त्याला प्रतीक्षा होती. १ जुलै रोजी अखेर त्याने आकाशला संपविले, सिटी कोतवाली पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. खुनाची घटना ही हमालपुऱ्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
पोलिसांनी प्रमोदला दुसऱ्याच दिवशी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत करीत आहेत.