संत्र्यांच्या भावात कमालीची घसरण
By Admin | Updated: October 9, 2015 00:55 IST2015-10-09T00:55:55+5:302015-10-09T00:55:55+5:30
विदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.

संत्र्यांच्या भावात कमालीची घसरण
शासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्यात ९०० कोटींची उलाढाल
संजय खासबागे वरूड
विदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. संत्रा व्यवसायातून ९०० कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. सध्या आंबिया बहराची संत्री कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. दरवर्षी संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे. बहुगुणी संत्र्याला राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातून वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेण्यात येते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देश-विदेशात परिचित असलेला वरुड तालुका ंसंत्र्याकरिता प्रसिध्द आहे. तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. दरवर्षी मृग बहराचा संत्रा उत्पादन घेतला जात होता. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असून मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली आहे.
आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरात कमालीची घसरण केली आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून संत्रा विकला जाण्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेची प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरीत परिणाम झाला आहे.
सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळाला ८०० ते एक हजार रुपये प्रतिहजार रुपये मोजावे लागतात. मध्यन प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे.
आंबिया बहराचा संत्रा उत्तर आणि दक्षिण भारतात विकला जात असून परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्राच्या भावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेच सावट पसरले आहे. संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी राष्ट्रीय संत्रा परिषद घेतली होती. आता विद्यमान आ. अनिल बोंडे यांनी संत्राचे महत्त्व देशात पटवून देऊन संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव आयोजित केला होता. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीसुध्दा प्रक्रिया केंद्राचे आश्वासन राष्ट्रीय संत्रा परिषदेत दिले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेदं्र फडणवीस यांनीसुध्दा मोर्शीला संत्रा रस प्रक्रिया केंद्र आणि वरुडला राज्यातून पहिला संत्रा डिहायड्रेशन (निर्जलीकरण) प्रकल्पाची घोषणा केली आहे. परंतु या घोषणा घोषणाच राहतील की, प्रत्यक्षात उतरतील, याबाबत संत्रा उत्पादक शंका उपस्थित करीत आहेत.