शार्ट सर्किटने घराची राखरांगोळी
By Admin | Updated: February 13, 2015 00:52 IST2015-02-13T00:52:32+5:302015-02-13T00:52:32+5:30
नजीकच्या मोर्शी (खुर्द) येथे बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. ग्रामस्थांसह पोरगव्हाणचे सरपंच संदीप कराळे यांनी ...

शार्ट सर्किटने घराची राखरांगोळी
एकदरा : नजीकच्या मोर्शी (खुर्द) येथे बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. ग्रामस्थांसह पोरगव्हाणचे सरपंच संदीप कराळे यांनी आग विझविण्याकरिता ग्रामपंचायतीतील फायर एक्टीग्युशरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने अखेर वरुड पालिकेच्या अग्निमशन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले.
बाभुळखेडा ग्रामपंचायतीतील गटग्रामपंचायत असलेल्या मोर्शी(खुर्द) येथे चंदू आनंदराव शेंडे आणि उमाकांत शेंडे यांचे चार भावाचे संयुक्त कुटुंब आहे. घरात ४५ क्विंटल कापूस, धान्य ठेवले होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक शार्ट सर्किटने आग लागली. जिल्हा परिषद बांधकाम सभापती गिरीश कराळे यांना माहिती मिळताच त्यांनी टँकर बोलावले. पोरगव्हाणचे सरंपच संदीप कराळे यांनी ग्रामपंचायतीत ठेवलेले फायर एक्स्टीग्युशरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर वरुड पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी गावातील विद्युत पुरवठा बंद असल्याने विहिरीवरील पंप सुरु करता आले नसल्याने ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार घरांसह ४५ क्विंटल कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले. वरुड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अंदाजे सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे शेंडे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत व घरकूल योजनेंर्तगत लाभ द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाने तहसीलदारांकडे केली आहे. (वार्ताहर)