पावसासाठी साकडे : नवदुर्गा मंदिरातही पूजाअर्चाबडनेरा : नव्यवस्तीतील आठवडी बाजारस्थित शंकर मंदिरात परिसरातील महिला, पुरुषांनी महादेवाच्या पिंडीचा गाभारा पाण्याने भरुन पाऊस पडण्यासाठी वरूणराजाला साकडे घातले. तसेच नवदुर्गा मंदिरात पूजाअर्चा करुन एक हजार लोकांना भोजन देण्यात आले. गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. बडनेरा ही शेतकऱ्यांची वस्ती आहे. ७५ टक्के शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वीच पेरण्या केल्या आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुबार पेरणीचे संकट समोर उभे आहे. पावसाचे तातडीने आगमन व्हावे यासाठी बडनेरावासीयांनी आठवडी बाजारस्थित शंकर, मारोती देवस्थानातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. पाऊस पडेपर्यंत पिंडीचा गाभारा पाण्याने भरला जाईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यवतमाळ मार्गावरील नवदुर्गा मंदिरात शेकडोंच्या संख्येतील महिला व पुरुषांनी पूजाअर्चा करुन वरुणदेवतेला साकडे घातले. यावेळी एक हजार लोकांना भोेजन दिले. महिलांनी धोंडी काढून वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी आराधना सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)
पाण्याने भरला शंकर मंदिराचा गाभारा
By admin | Updated: July 18, 2015 00:10 IST