नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज !

By Admin | Updated: October 14, 2016 01:02 IST2016-10-14T01:02:19+5:302016-10-14T01:02:19+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला,

Shankar Maharaj tried for the sacrifice! | नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज !

नरबळी प्रयत्नामागे शंकर महाराज !

शासनाला प्रत : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सत्यशोधन अहवाल
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांच्या नरबळीचा जो प्रयत्न झाला, तो आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महाराज यांच्या इशाऱ्यावरून झाला असल्याचा निष्कर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्यशोधन अहवालात मांडला आहे.
समितीने १२ पानांचा सत्यशोधन अहवाल शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या अहवालाची प्रत पाठविण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या अहवालात अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केलेली तत्थ्ये पोलीस आणि न्यायिक अधिकाऱ्यांना दुर्लक्षित करता येणार नाहीत, अशीच आहेत.
समाजातील अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, परंपरा व घातक अंधश्रद्धांच्या विरोधात सनदशीर मार्गाने व्यापक लोकप्रबोधन करीत आलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३४ वर्षांत हजारो बुवा-बाबा, ढोंगी देवी-देवता, मांत्रिक-तांत्रिकांचा जाहीर भांडाफोड केला असल्याचा परिचय समितीच्या सत्यशोधन अहवालात प्रारंभीच देण्यात आला आहे.
अहवालानुसार, शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश आणि अजय यांच्यावर झालेल्या नरबळी हल्ल्यापूर्वीही अनेक अपमृत्यू झाले आहेत. चार विद्यार्थ्यांसह एकूण पाच जणांच्या संशयास्पद मृत्युंची माहिती समितीने नावांसह या अहवालात नमूद केली आहे.
पाच एकर जमीन आणि साडेतीन हजार रुपये रोख इतकी अल्प संपत्ती १९९५ साली आश्रमाकडे होती. आज ही संपत्ती कैकपटीने वाढून ३५० एकर जमीन झाली. त्यातील २०० एकर जमीन ट्रस्ट व कृषी महाविद्यालयाच्या नावे तर उर्वरित १५० एकर जमीन शंकर महाराजांच्या नातेवार्इंकांच्या नावाने आहे. पुणे, पंढरपूर यासह अनेक ठिकाणी आश्रमाच्या जमिनी असल्याची तत्थ्ये अहवालात अधोरेखित केली आहेत.
१२ पानांच्या या अहवालातील हे मोजकेच ठळक मुद्दे होत. विस्ताराने लिहावे, अशी अनेक धक्कादायक तत्थ्ये या अहवालात आहेत. नरबळी प्रकरणात शंकर महाराज, त्यांचे नातेवाईक आणि विश्वस्त हे आरोपी असल्याची अनेक कारणे दिली आहेत. सर्वांवर नरबळीविरोधी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईची गरजही समितीने व्यक्त केली आहे.

कजलीवाला
शंकर बुधाजी नागपुरे उर्फ शंकर महाराज यांना कजलीवाला म्हणून लोक पूर्वीपासून ओळखतात. काजळी धरलेल्या ताटात किंवा आरशात बघून हरविलेली वस्तू, जमिनीखालचे पाणी, गुप्तधन इत्यादी शोधण्यासाठी वापरली जाणारी तथाकथित अंधश्रद्धाळू विधी म्हणजे कजली. या विधीचा उपयोग करून, अंतर्दृष्टी असल्याचे भासवून, वस्तू, धन, पाणी वगैरे शोधण्याचा जो दावा करतो त्याला कजलीवाला म्हणतात, असा शंकर महाराजांविषयीचा शोध-इतिहास अहवालात उघड करण्यात अला आहे.

असा केला अभ्यास
सत्यशोधन समितीने ३५ दिवस शोधकार्य केले. चमू तीनवेळा शंकर महाराजांच्या आश्रमात जाऊन आली. आश्रमातील लोक, शंकर महाराजांचे भक्त, पूर्वी आश्रमाशी संबंधित असलेले पिंपळखुट्यातील नागरिक, इतर गावकरी, तपास अधिकारी, अंजनसिंगी, अंजनवती, कावली, कुऱ्हा, वरूडा, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अमरावती, धानोरा म्हाली गावातील नागरिकांशी समितीने संपर्क साधला. अजय वणवे, प्रथमेश सगणे आणि अटकेतील आरोपींच्याही नातेवार्इंकांशी चर्चा केली. माहितीची शहानिशा केली. धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, अंजनसिंगी, अमरावती येथे सर्वपक्षीय मोर्चे निघालेत. कडकडीत बंद पाळलेत. त्या आंदोलकांशीही संवाद साधला. माध्यमांशी चर्चा केली.
या समितीत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे, जिल्हा संघटक शेखर पाटील, तत्कालीन जिल्हा संघटकद्वय राजीव खिराडे आणि मंगेश खेरडे यांचा समावेश आहे.

Web Title: Shankar Maharaj tried for the sacrifice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.