शकुंतला रेल्वे मार्गाचे लवकरच होणार ब्रॉडगेज!

By Admin | Updated: September 27, 2015 00:16 IST2015-09-27T00:16:09+5:302015-09-27T00:16:09+5:30

मूर्तिजापूर ते अचलपूर हा ७७ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून पुढे चांदूरबाजारपर्यंत जोडला जावा.

Shakuntala rail route will soon be a broad gauge! | शकुंतला रेल्वे मार्गाचे लवकरच होणार ब्रॉडगेज!

शकुंतला रेल्वे मार्गाचे लवकरच होणार ब्रॉडगेज!

अंजनगाव सुर्जी : मूर्तिजापूर ते अचलपूर हा ७७ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून पुढे चांदूरबाजारपर्यंत जोडला जावा. जेणेकरुन अमरावती-नरखेड ते पुढे बैतूल हा दिल्लीस जाणारा मार्ग अंजनगाव-दर्यापूरवासीयांना उपलब्ध होईल, अशी माहिती खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे रेल्वे प्रकल्प आढावा बैठक झाली. राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील रखडलेल्या रेल्वे मार्गांच्या समस्या निकाली काढून हे प्रकल्प गतिमान व्हावेत यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर होणार आहे. विदर्भातील इतर चार मोठे रेल्वेमार्गही या कंपनीअंतर्गत विकसित होतील, अशी अपेक्षा आहे.
अचलपूर ते चांदूरबाजार हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. यामुळे शकुंतलेच्या मार्गातील अंजनगाव-दर्यापूर वासीयांना ब्रॉडगेजच्या माध्यमातून थेट नरखेड रेल्वे लाईनवर बैतूल ते दिल्ली हा मार्ग उपलब्ध होईल. अकोला ते खंडवा नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे व बडनेरा येथील वॅगन दुरुस्तीच्या कामास गती देणे, हे या बैठकीचे महत्त्वाचे फलित आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सहभागाविषयी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री आणि खासदार यांच्यात पुढील बैठकीचे नियोजन झाले आहे. त्यामध्ये विदर्भातील रेल्वे प्रकल्प गतिमान करण्यावर भर दिला जाईल. मराठी माणसांच्या या कर्तृत्वामुळे आणि विदर्भपूत्र मुख्यमंत्री झाल्याने या भागातील रेल्वेचा अनुशेष भरुन काढण्यासाठी भरीव कामगिरी करण्याचा हा मानस अभिनंदनीय आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी पाचशे कोटींची आवश्यकता असून रेल्वे मंत्रालयाच्या पिटीशन कमेटीत दावा दाखल करुन खा. अडसूळ यांनी या रेल्वे मार्गासाठी निधी मागितला होता. यासाठी मंजुरी प्राप्त झाल्याने आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यामधील राज्य शासनाचा हिस्सा मान्य झाल्यामुळे लवकरच या मार्गाच्या ब्रॉडगेजसाठी सुरुवात होणार असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले आहे.

Web Title: Shakuntala rail route will soon be a broad gauge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.