चांदूरबाजार तालुक्यात होणार २२२ ठिकाणी शक्तीची उपासना
By Admin | Updated: October 11, 2015 01:44 IST2015-10-11T01:44:12+5:302015-10-11T01:44:12+5:30
यावर्षीच्या नवरात्रौत्सवात तालुक्यात २२२ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा व शारदा देवीची प्रतिष्ठापना करून सामूहिकरीत्या शक्तीची उपासना केली जाणार आहे.

चांदूरबाजार तालुक्यात होणार २२२ ठिकाणी शक्तीची उपासना
सुमित हरकूट चांदूरबाजार
यावर्षीच्या नवरात्रौत्सवात तालुक्यात २२२ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा व शारदा देवीची प्रतिष्ठापना करून सामूहिकरीत्या शक्तीची उपासना केली जाणार आहे. यात १५९ दुर्गादेवीचा व ६३ शारदा देवींचा समावेश आहे. या उत्सवात सार्वजनिक देवींची संख्या पाहता शक्ती उपासनेवर देवीभक्तांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असल्याचे जाणवते. १३ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या नवरात्रौत्सवामध्ये २२२ पैकी ४४ गावांमध्ये एक गाव एक दुर्गा व एक गाव एक शारदा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
चांदूरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत ११७ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव व शारदा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यामध्ये विविध ठिकाणी ९० दुर्गा व २७ शारदांची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन नवरात्राची उपासना केली जाणार आहे. यात शहरामध्ये ११ दुर्गा व ३ शारदा विराजमान होणार असून ग्रामीण भागात ७९ दुर्गा व २४ शारदा विराजमान होणार आहेत. या पोलीस स्टेशन अंतर्गत २१ गावांमध्ये एक गाव एक दुर्गा व ७ गावांमध्ये एक गाव एक शारदा हा उपक्रम राबविल्या जात आहे. या स्तुत्य उपक्रमामध्ये सर्फाबाद, बोरज, आखतवाडा, खरवाडी, खराळा, चिंचोली काळे, सांभोरा, चिंचकुंभ, वडाळा, थूगाव, हैदतपूर, पिंपरी पूर्णा, निंभोरा, रेडवा, माधान, काजळी, कोदोरी, विश्रोळी, जालनापूर, डोमक, परसोडा, पिंपळखुटा, वाठोंडा, राजूरा, फुबगाव, बेलमंडळी, सोनोरी, शहापूर आदी गावांनी आपला सहभाग दर्शविला आहे.
आसेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ ठिकाणी सार्वजनिकरीत्या शक्ती उपासना केली जाणार असून १७ दुर्गादेवी व १२ शारदादेवी मंडळांचा समावेश आहे. या पोलीस स्टेशनमध्ये १६ ठिकाणी एक गाव एक दुर्गा हा उपक्रम राबविल्या जाणार असून यात १४ दुर्गादेवी व २ शारदादेवींचा समावेश आहे. तालुक्यात हे ठाणे गणेश उत्सवाप्रमाणे, नवरात्र उत्सवातही या उपक्रमात आघाडीवर आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता या ठाण्याचे ठाणेदार बाबाराव अवचार व खुफिया हवालदार विकास धंडारे यांनी परिश्रम घेत आहेत. आसेगाव ठाण्यातील या उपक्रमात सहभागी झालेली गावे, राजना पूर्णा, अमृल्लापूर, खाजनापूर, टाकरखेडा पूर्णा, कृष्णापूर, धानोरा पूर्णा, दहिगाव पूर्णा, विसेगाव, हिवरा, तळणीपूर्णा, येवता, येलकी, विरुळ पूर्णा, नबापूर व आसेगाव या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील शिरजगाव ठाण्यांतर्गत एकूण ८६ देवींची शक्ती उपासनेसाठी सार्वजनिक देवींची स्थापना करण्यात येणार आहे.
तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनमधील एकूण ९ गावे दुर्गा उत्सवामध्ये संवेदनशिल असून यात चांदूरबाजार ठाण्यात पाच, आसेगाव व शिरजगाव कसबा ठाण्यात प्रत्येकी दोन गावांचा समावेश आहे. या संवेदनशिल गावामध्ये चांदूर ठाण्यातील ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, थुगाव, बेलोरा, चांदूरबाजार तर आसेगाव ठाण्यातील पूर्णानगर, राजणा व शिरजगाव ठाण्यातील करजगाव, शिरजगाव कसबा गावांचा समावेश आहे. त्यासाठी बंदोबस्तासाठी या तिन्ही ठाण्यांनी वरिष्ठांकडे अतिरिक्त पोलीस बलाची मागणी केली आहे. या नवरात्र उत्सवावर आसेगाव ठाण्यासह चांदूरबाजार ठाण्याचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत व शिरजगावचे ठाणेदार विलास चौगुले यांचेसह राजू हिरुळकर, सचिन भुजाडे हे लक्ष ठेवून आहेत.