'भस्म करणे', 'मारून टाकण्या'ची सिद्धी
By Admin | Updated: August 30, 2016 23:57 IST2016-08-30T23:57:01+5:302016-08-30T23:57:01+5:30
प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला,

'भस्म करणे', 'मारून टाकण्या'ची सिद्धी
'अनुभव ब्रह्म' : शंकर महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकात नाना आश्चर्य
अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या पाचवीतील मुलांवर नरबळीच्या उद्देशाने ज्या आश्रमाच्या हद्दीत हल्ला झाला, त्या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव बह्म' या पुस्तकात ‘कुणाचे खूप नुकसान करणे, मारून टाकणे, भस्म करणे’ यासाठीच्या सिद्धींची चर्चा करण्यात आली आहे.
श्री संत शंकर महाराज असे लेखकाचे नाव या 'अनुभव ब्रम्ह' पुस्तकावर नमूद असून प्रकाशन समिती, विश्वमंदिर भक्तीधाम, श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट, श्रीक्षेत्र पिंपळखुटा, असा प्रकाशकाचा उल्लेख आहे.
या पुस्तकात एकूण २५ प्रकरणांचा समावेश आहे. ध्यान, उपासना, योग आदी मुद्यांसह त्राटक आणि सिद्धी या विषयांवरही शंकर महाराजांनी लिखाण केले आहे.
पुस्तकाच्या प्रारंभी परतवाड्याचे भास्कर मोहोड यांचे ऋणनिर्देश आहेत. त्यात सुरुवातीलाच ‘श्री समर्थ सद्गुरू श्री संत शंकर महाराजांनी श्री समर्थ लहानुजी महाराजांच्या आज्ञेवरून, स्वानुभवातून निर्मिलेला अनुभव ब्रम्ह हा अनुपम ग्रंथ आज आपल्या सेवेशी सादर करताना कृतार्थ वाटत आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.
शंकर महाराजांनी पुस्तकाच्या प्रारंभी 'हृदयगत' लिहिले आहे. त्यातील अखेरच्या परिच्छेदात ‘या अनुभवग्रंथाचे सारच असे आहे की, जे यातील रहस्य आपल्या जीवनात अनुभवतील त्यांचे दु:खमय असणाऱ्या संसारातून त्यांच्या ठायी आत्मप्राप्ती होऊन तो संसार सुखमय होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुस्तकातील २१ व्या प्रकरणात शंकर महाराज यांनी ‘योगमार्गातील अष्टसिद्धीचे प्रभाव लक्षण’ लिहिले आहेत. ‘ज्यांना पूर्ण निर्विकल्प समाधी योगाचा अनुभव आलेला असतो त्यांनाच अनिमा, गणिमा, लघीमा, गिरीमा, हुताशनी, महिमा, अंतरयामिनी आणि वाचासिद्धी अशा अष्टसिद्धी प्राप्त होतात’, असा लघु परिचय देऊन या प्रकरणातील आठव्या क्रमांकावर त्यांनी ‘वाचासिद्धी’बाबत केलेले लिखाण असे- ‘शाप किंवा आशीर्वाद हे फलित होणे. ज्याप्रमाणे कोणाला पुत्र-धन देणे, कोणाचे फार मोठे नुकसान करणे, कुणाला मारून टाकणे, कुणाला भस्म करणे, इत्यादी क्रिया प्राप्त होतात. याला वाचा सिद्धी असे म्हणतात’.
महाराजांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक अद्भूत मुद्दे आहेत. हा ग्रंथ शंकर महाराजांनी स्वानुभवातून निर्मिलेला असल्याचे ग्रंथाच्या प्रारंभीच स्पष्ट केल्यामुळे पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या रहस्यमय बाबी विशेष महत्त्वपूर्ण ठरतात.