शेतकऱ्यांचा सातबारा करा कोरा
By Admin | Updated: March 26, 2016 00:07 IST2016-03-26T00:07:19+5:302016-03-26T00:07:19+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा. गारपीटमुळे नुकसानग्रस्त ...

शेतकऱ्यांचा सातबारा करा कोरा
रवी राणा यांची मागणी : केंद्रीय वित्तमंत्र्यांना साकडे
अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा. गारपीटमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये याप्रमाणे मदत मिळावी, अशी आर्त हाक आ. रवी राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. अर्धातास चाललेल्या चर्चेत आ.राणा यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
दिल्ली येथे आ. रवी राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्री जेटली यांची भेट घेऊन अमरावती जिल्ह्यात निर्माण झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती विशद केली. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना मुलांबाळांचे शिक्षण, लग्नप्रसंग करणे कठीण झाले आहे. बँक कर्ज, सावकारी कर्जाच्या विळख्याने शेतकरी खचला आहे. त्यामुळे सरसट कर्जमाफी देऊन त्याचा जगण्याचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी आ. राणा यांनी केली. नुकत्याच झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागासवर्गिय, आदिवासी, ओबीसी समाजाचे शेतकरी अधिक आहेत. सततच्या नापिकीने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी राणा यांनी केली.
सुवर्णकार व्यवसायावरील
अबकारी कराचा मुद्दा मांडला
केंद्र शासनाने सोने- चांदी व्यवसायावर एक्साईज ड्युटी आकारल्यामुळे सुवर्णकार व्यवसाय कोलमडला आहे. त्याकरिता देशभरातील सुवर्णकारांनी बंद पुकारला असून विदर्भातील सराफा व्यवसायिकांनी यात समावेश घेतला आहे. महागाई, नापिकी, दुष्काळ अशा पार्श्वभूमिवर सोने, चांदी व्यवसायावर आकारण्यात आलेला आबकारी कर रद्द करण्यासाठी आ. राणा यांनी केंद्रीय वित्तमंत्र्यांना साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)