अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: August 30, 2016 00:02 IST2016-08-30T00:02:24+5:302016-08-30T00:02:24+5:30
तपोवन वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी ठोठावली.

अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा
तपोवन वसतिगृहातील प्रकरण : न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अमरावती : तपोवन वसतिगृहातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी ठोठावली. दादाराव गिरीराम खंडारे (५०,रा. तपोवन वसतिगृह) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनमध्ये अनाथ मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड होताच राज्यभरात खळबळ उडाली होती. तपोवन येथील शाळेत शिक्षण घेणारी पीडित १७ वर्षीय मुलगी ही १० आॅक्टोबर रोजी सुटीच्या दिवशी वसतिगृहात एकटीच होती. ती वसतिगृहाच्या आवारात फिरत असताना आरोपी दादारावने तिला ‘कर्णफूल’ या निवासस्थानी बोलविले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब काही दिवस उघड झाली नव्हती. मात्र, मुलीने धाडस दाखवून २१ डिसेंबर २०१४ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दादाराव खंडारेविरूद्ध भादंविच्या कलम ३७६(ब), सह पॉक्सोची कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणात सहायक पोलीस आयुक्त एस.एन.तळवी यांनी तपासकार्य पूर्ण करून १८ फेब्रुवारी २०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा न्यायाधीश (२) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी तीन साक्षीदार तपासले.
दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर आरोपीला भादंविच्या कलम ३७६ व पॉक्सो ६,१०, १२ नुसार दोषमुक्त करण्यात आले तर पॉक्सो ४, ८ मध्ये अनुक्रमे ७ व ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून गोपाल भारती यांनी कामकाज पाहिले.
‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा
तपोवन येथील मुलींच्या वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या मुली असुरक्षित असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले होते. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. पुढे तपोवनमधील मुले, मुली असुरक्षित असल्याचे मान्य करुन त्यांना इतरत्र हलविण्यात आले होते.