वरुडमध्ये सात दुकाने सील, चार उपाहारगृहांकडून ९ हजार रुपये दंड वसूल!
नगर परिषद मुख्याधिकऱ्यांची कारवाई!
वरुड : शहरात ९ मे दुपारी १२ वाजतापासून कडक बंद असताना काही दुकानदारांनी दुकाने उघडून माल विक्री केली तर उपाहारगृहसुद्धा उघडे दिसल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी पथकासह जाऊन सात दुकाने सील तर पाच उपाहारगृहांकडून ९ हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केली.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून सर्व सेवा बंद आहे. नऊ मे ते १५ मेपर्यंत संचारबंदी आणि लॉकडाऊनचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहे; मात्र आदेशाला केराची टोपली दाखवून शहरातील काही बहाद्दर दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवून माल विक्री करताना आढळून आले. यामध्ये केदार चौक परिसरातील जगदंबा जनरल स्टोर, आनंद कलेक्शन सती चौक, मंगलमूर्ती गिफ्ट न. प. व्यापारी संकुल, रोशन कलेक्शन डेपो रोड, सायली प्रेझेटेशन आणि संस्कृती ड्रेसेस सती चौक ही दुकाने माल विक्री करीत असताना आढळून आल्याने ७ दुकाने सील करण्यात आली. तर श्री यशवंत हॉटेल, चक्रधर उपाहारगृह, महावीर उपाहारगृह, अंबाडकर जनरल यांना प्रत्येकी १ हजार रुपये तर अतुल फुटाणे यांच्या दुकानावर ५ हजार रुपये दंड असा एकूण ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मुख्याधिकारी रवींद्र पाटील, उपमुख्यधिकारी गौरव गाडगे तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या तसेच पोलीस, महसूल आणि पंचायत समितीच्या पथकाने केली.