टॉवरवर सात तास वीरुगिरी
By Admin | Updated: August 27, 2014 23:11 IST2014-08-27T23:11:29+5:302014-08-27T23:11:29+5:30
अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झालेल्या घराच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून तत्काळ मदत मिळावी म्हणून नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील जनुना येथील २५ वर्षीय युवकाने तब्बल सात तासांपर्यंत

टॉवरवर सात तास वीरुगिरी
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा
अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झालेल्या घराच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून तत्काळ मदत मिळावी म्हणून नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील जनुना येथील २५ वर्षीय युवकाने तब्बल सात तासांपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या टॉवरवर विषारी औषधाची बाटली घेऊन वीरुगिरी आंदोलन केले. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर त्याने आंदोलन मागे घेतले.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनुना येथील देवीदास शंकरराव कबले यांचे घर जमीनदोस्त झाले. तीन लहान मुलांसह एकूण ७ जणांचे कुटुंब उघड्यावर आले. प्रशासनाने बेदखल केले. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराही त्याने दिला होता. अखेर २७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता देवीदास ग्रामपंचायतीच्या टॉवरवर विषारी औषधाची बाटली घेऊन चढला. त्याने ग्रामपंचायत फाटकाला आतून कुलूप लावले.
अखेर नुकसानीची मदत मिळणार
सरपंच, तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्याच्या नावाची चिठ्ठी फाटकावर चिपकविली व माझ्या आत्महत्येस वरील सर्वजण जबाबदार राहील, असे त्यात नमुद केले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदगावचे प्रभारी तहसीलदार एन.बी. पिसोळे, मंडळ अधिकारी पी.एच. काळे, सरपंच अनिल सुने, ग्रामसेवक व्ही.डी. रंगारी, तलाठी कडू लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पो. निरीक्षक डी.आर. बावणकर, हे घटनास्थळी पोहचले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देवीदासच्या घराचा पंचनामा करुन तुला आम्ही तत्काळ नुकसान भरपाई देऊ, असे तहसीलदारांच्या सहीचे पत्र वाचून दाखविल्यावरच देवीदास टॉवरवरुन तब्बल सात तासांनंतर खाली उतरला. गेल्या एक महिन्यांपासून देवीदास हा ग्रामपंचायतीच्या आवारात कुटुंबासह वास्तव्यास होता. देवीदास याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा लोणी पोलिसांनी दाखल केलेला आहे.