अमरावती : राज्यात गत १३ वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या १०० टक्के अनुदानावर एपीडीआरपी (वेगवान ऊर्जा विकास आणि सुधारणा कार्यक्रम) योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च करून सात ठिकाणी उभारलेला महावितरणचा ‘स्काडा’ हे ड्रीम प्रोजेक्ट अखेरची घटका मोजत आहे. तो आता देखभाल- दुरुस्तीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचारी इतरत्र वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
महावितरणने २०१२-१३ मध्ये अमरावती, तसेच इतर सात महानगरांमध्ये शेकडो कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘स्काडा’ प्रकल्प प्रोजेक्ट सुरू केला. हा प्रकल्प उभारताना केंद्र सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे महानगरपालिका क्षेत्राची वीज हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी करणे, यासह तंत्रज्ञानाचा उपयोग करून वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करणे असा होता. त्यानुसार तत्कालीन महावितरणनेसुद्धा एक ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून निर्माण सुरू केले आणि २०१६ मध्ये हा प्रकल्प तयार करून ऑपरेशनला (संचालित) केला. निविदा अटी-शर्तींनुसार पहिली पाच वर्षे सिमेन्स कंपनीला देखभाल-दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. तोपर्यंत हा प्रकल्प व्यवस्थित होता; परंतु त्यानंतर वार्षिक देखभालचे कंत्राट न दिल्यामुळे हळूहळू तांत्रिक बिघाड, दुरुस्तीसाठीची यंत्रणा नसल्यामुळे ‘स्काडा’ केंद्राचे संचालन बंद होत गेले. आता तर हे प्रकल्प शेवटची घटका मोजत आहेत.
१) सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये खर्चून जो प्रकल्प तयार केला. तो केवळ देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडावा, यासारखे दुर्दैव असू शकणार नाही.२) एखादा प्रकल्प ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून नावारूपाला आणला जाताे; पण त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते कसे? तसेच खर्च झालेला निधी हा सामान्य जनतेच्या घामाचा पैसा असा वाया जात आहे. त्यास कोण दोषी आहे, याचे उत्तर सामान्य नागरिकास मिळणे आवश्यक आहे.
सबऑर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएशनची सरकारकडे धावअमरावती, नाशिक, पुणे, साेलापूर, भांडुप, सांगली व कोल्हापूर या महानगरांतील महावितरणचे ‘स्काडा’ केंद्र बंद होत असल्याबाबत सबऑर्डिनेट इंजिनिअरिंग असोशिएशनने १९ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. हा प्रकल्प तो का आवश्यक आहे, याची कारणे नमूद करीतअसोसिएशनचे सरचिटणीस संतोष खुमकर यांनी सरकारकडे धाव घेतली आहे. मालेगाव येथील केंद्र अगोदरच फ्रॅचाईजीत गेले आहे.
‘स्काडा’ म्हणजे काय?पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन (स्काडा) ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर घटकांची एक प्रणाली आहे. ती संस्थांना प्लांट-फ्लोअर मशिनरीशी थेट इंटरफेस करून आणि रिअल-टाइम डेटा पाहून औद्योगिक प्रक्रिया नियंत्रित आणि देखरेख करण्यास अनुमती देते. ही अत्याधुनिक प्रणाली असून मानवी-मशीन इंटरफेस, सॉफ्टवेअरद्वारे सेन्सर्स, व्हॉल्व्ह, पंप, मोटर्स आणि इतर उपकरणांशी थेट संवाद साधण्यास मदत करते.