अर्धवट जाळलेले शिक्के जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:14 IST2018-12-15T22:13:50+5:302018-12-15T22:14:14+5:30
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने जात प्रमाणपत्र वितरित केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बाबाराव कृष्णराव भवते याची कोठडी मिळविल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी निमखेड बाजार गाठून त्याच्या घरातून अर्धवट जाळलेले शिक्के जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत २२ बनावट जात प्रमाणपत्रे ताब्यात घेतली आहेत.

अर्धवट जाळलेले शिक्के जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने जात प्रमाणपत्र वितरित केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बाबाराव कृष्णराव भवते याची कोठडी मिळविल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी निमखेड बाजार गाठून त्याच्या घरातून अर्धवट जाळलेले शिक्के जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत २२ बनावट जात प्रमाणपत्रे ताब्यात घेतली आहेत.
सन २००६ मध्ये धारगड येथील यात्रेदरम्यान जनता दरबारात जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तेथे राखीचे दुकान लावणाºया बाबारावला शासकीय शिक्के व कोरे जात प्रमाणपत्र मिळाले. त्याआधारे तत्कालीन उपविभागीय अधिकाºयांची खोटी स्वाक्षरी करून नागरिकांना त्याने जात प्रमाणपत्र वाटप केले.
पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सहायक निरीक्षक प्रीती निचळे, वसंत चव्हाण, अनिल झारेकर यांनी बाबारावला निमखेड बाजार येथे शिक्के जप्त करण्याकरिता नेले होते. कारवाईची भनक लागल्याने अटकेपूर्वीच घरातील चुलीमध्ये ते शिक्के त्याने जाळले होते. त्याचे शिल्लक राहिलेले सांगाडे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी जप्त केले. आरोपीने मेळघाटातील धारणी, चिखलदरा, अचलपूर या परिक्षेत्रात बनावट जात प्रमाणपत्र वाटले. शुक्रवारी रात्री अचलपूर तालुक्यातील चमक येथून आणखी पाच बोगस जात प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शनिवारपर्यंत एकूण २२ जात प्रमाणपत्रे पोलिसांना मिळाली.
नाव नव्हे, मोबाईल क्रमांक हीच ओळख
बाबाराव भवतेने गरजू आदिवासी बांधवांना दीड ते दोन हजार रुपयांत बोगस जात प्रमाणपत्र वाटले. त्यासाठी गावागावांत फेरफटका मारला. पण, स्वत:चे नाव जाहीर करण्याऐवजी मोबाईल क्रमांकच तो कळवत होता. त्यावरूनच आरोपीचा पोलिसांनी शोध लावला.