राणांच्या कार्यालयावर सेनेचा हल्ला
By Admin | Updated: December 27, 2016 00:48 IST2016-12-27T00:48:02+5:302016-12-27T00:48:02+5:30
नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाच्या निर्मितीचा श्रेयवाद वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राणांच्या

राणांच्या कार्यालयावर सेनेचा हल्ला
श्रेयाच्या लढाईला हिंसक वळण : राजकीय वाद पेटला, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल
अमरावती : नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाच्या निर्मितीचा श्रेयवाद वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राणांच्या पत्रपरिषदेनंतर उफाळून आलेल्या सेनेच्या संतापाचा सोमवारी उद्रेक झाला. नारेबाजी करीत आ. रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या बडनेरा येथील कार्यालयावर धडकलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयाबाहेर लावलेले बॅनर, बोर्ड फाडून खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बडनेरासह अमरावती शहरातही काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आ. राणांसह अन्य दोन कार्यकर्त्यांनी झालेल्या प्रकाराची तक्रार बडनेरा पोलिस ठाण्यांत नोंदविली. तक्रारीच्या आधारे शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे
मागील आठवड्यात बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे पुलाचे आ. राणा यांनी नाट्यमयरित्या उद्घघाटन केले होते. थोड्याच वेळात अडसुळांनीही पूलावर पोहोचून राणांचे फलक फाडून पुन्हा पूलाचे लोकार्पण केले.
राणांनी या पूलाच्या निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे अडसुळांनी बजावले. त्यानंतर राणांनी रविवारी थेट पत्रपरिषद अडसुळांना आव्हान दिले.
राणांच्या राजापेठस्थित कार्यालयात गर्दी
४बडनेरात आ. राणांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची घटना कळताच राणा समर्थकांनी राजापेठस्थित जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता.या घटनेचे पडसाद उमटून राजापेठ परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत राणांच्या या कार्यालयात पोलीस बंदोबस्त कायम होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
बडनेरा पोलीस ठाण्यात राणांचा ठिय्या
४युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड करुन महिलेला मारहाण, शिवीगाळ तसेच महापुरुषांच्या प्रतिमांची नासधूस केल्याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आ. रवि राणा स्वत: बडनेरा पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन होते. यावेळी अजय जयस्वाल, नगरसेवक विजय नागपुरे, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड आदी उपस्थित होते.
सेना कार्यालयांना पोलीस संरक्षणाची गरज नाही
४या घटनेनंतर परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी सेनेच्या कार्यालयांपुढे बंदोबस्त लावला होता. मात्र शिवसेनेला पोलीस संरक्षणाची गरज नाही, असे स्पष्ट करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी पोलीस संरक्षण नाकारले. त्यांनी बंदोबस्तासाठी आलेले पोलिस देखील परत पाठविले.
‘अॅक्शन’ ला ‘रिअॅक्शन’ हा निसर्गाचा नियम आहे. राणांनी केलेल्या कृत्याला शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. ही केवळ सुरूवात आहे. राणांनी शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नये, अन्यथा यापुढे गंभीर परिणाम होतील.
- आनंदराव अडसूळ
खासदार, अमरावती.
नरखेड रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असताना तो रहदारीसाठी सुरु व्हावा, यासाठी सिटीबस व आॅटोरिक्षा चालकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अडसुळांच्या गुंडांनी कार्यालयाची तोडफोड करुन त्यांची विध्वंसक संस्कृती दाखवून दिली आहे. अडसुळांसह युवासेनेच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक व्हावी
- रवि राणा, आमदार, बडनेरा