सेनेचा वरचष्मा, काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन जागा
By Admin | Updated: September 14, 2014 23:45 IST2014-09-14T23:45:21+5:302014-09-14T23:45:21+5:30
जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी आज रविवारी निवडणूक पार पडली. यात शिवसेनेने तीन पंचायत समितींवर भगवा फडकविला. काँगे्रस,

सेनेचा वरचष्मा, काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन जागा
पं.स. सभापती-उपसभापती निवडणूक : भाजपची पीछाडी, रिपाइं, बसप, प्रहारला संधी
अमरावती : जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी आज रविवारी निवडणूक पार पडली. यात शिवसेनेने तीन पंचायत समितींवर भगवा फडकविला. काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी दोन सभापतीपद मिळाले. यात रिपाइं, बसप व प्रहारलाही संधी मिळाली. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप माघारली.
अमरावती पंचायती समिती सभापतीपदी शिवसेनेचे आशिष धर्माळे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे भाष्कर गभणे अविरोध विजयी झाले. येथे शिवसेना व राष्ट्रवादीने युती करुन निवडणूक अविरोध घडवून आणली. अंजनगाव-सुर्जी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विनोद टेकाडे व उपसभापतीपदी भाजप समर्थित नितीन पटेल विजयी झाले. आठ सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या समर्थनाने शिवसेनला सत्ता काबीज करण्यात यश मिळाले.
भातकुली पंचायत समितीत शिवसेनेच्या सुनीता वानखडे या सभापती तर उपसभापतीपदी युवा स्वाभिमान संघटनेच्या संगीता चुणकीकर विजयी झाल्यात. भातकुलीत शिवसेना, राष्ट्रवादी व युवा स्वाभीमान संघटनेने युती केली होती. नांदगाव (खंडेश्वर)मध्ये बसपच्या शोभा इंगोले सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या रेखा नागोलकर विजयी झाल्या. येथे बसप व शिवसेनेने हातमिळवणी करुन सत्ता काबिज केली.
अचलपूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सोनाली देशमुख तर उपसभापतीपदी प्रहारचे गजानन मोरे विजयी झाले. येथे काँग्रेस-प्रहारची युती होती. मोर्शी पंचायत समितीमध्ये सभापतीपदी राष्ट्रवादीच्या पद्मा पंचाळे यांची अविरोध तर उपसभापतीपदी अपक्ष रेखा संजय सोनटक्के विजयी झाल्या. सोनटक्के यांनी राष्ट्रवादीचे अनिल अमृते यांचा पराभव केला.
दर्यापूर पंचायत समिती सभापतीपदी रिपाइंच्या रेखा वाकपांजर तर शिवसेनेचे संजय देशमुख उपसभापती अविरोध विजयी झाले. शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादीच्या युतीने ही सत्ता मिळविली.
चिखलदरा येथे काँग्रेस पक्षाने भाजप उमेदवारांचा पराभव करुन दोन्ही जागा मिळविल्या. सभापतीपदी काँग्रेसचे दयाराम काळे तर उपसभापतीपदी भागिरथी चिमोटे विजयी झाल्या. चांदूरबाजारमध्ये प्रहारने सभापती-उपसभापतीपदावर निर्विवाद वर्चस्व मिळविले. बारा सदस्य संख्या असलेल्या चांदूरबाजार पंचायत समितीमध्ये प्रहारची सदस्य संख्या सहा आहे. सत्ता स्थापनेसाठी सातचे संख्याबळ आवश्यक असताना काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने प्रहारच्या अर्चना अवसरमोल सभापतीपदी तर उपसभापतीपदी राजेश सोलव विजयी झाले. वरुड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा झेंडा रोवला. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नीता सुरेंद्र जिचकार तर उपसभापतीपदी मोहन अलोणे आरुढ झाले. त्यांनी काँग्रेस-विदर्भ जनसंग्राम युतीच्या उमेदवाराचा पराभव केला.