ज्येष्ठांनी लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:43+5:302021-03-13T04:24:43+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी लसीकरण सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन ...

ज्येष्ठांनी लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे
अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी लसीकरण सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले.
गत वर्षांपासून कोविड-१९च्या महामारीसोबत दोन हात करीत आहोत. सुरुवातीच्या काळात त्रिसूत्रीचे महत्त्व सांगण्यात आले. पण, त्याचे पालन बहुतेकांकडून व्हायला बराच काळ जावा लागला. मधल्या काळात काहीशी बेफिकिरीही आली. विषाणू कुठलाही भेदभाव करत नाही. कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. आजपर्यंतच्या सर्व महामारी या तीन ते चार वर्षे चालल्या, असे इतिहास सांगतो. पूर्वी वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते. त्यामुळे विषाणूचा नैसर्गिक ऱ्हास व सुरक्षित अंतर याच दोन गोष्टी साथ आटोक्यात आणण्यासाठी उपलब्ध होत्या, आता तसे नाही. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आपल्याला या विषाणूबाबत जाणून घेता आले. त्याचाच फायदा आपल्याला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी होणार आहे, असे निकम यांनी सांगितले.
-------------------
७० टक्के लोकसंख्येत प्रतिकारशक्ती विकसित हवी
नैसर्गिकरीत्याही शक्ती विषाणूचा प्रवेश झाल्यानंतरच विकसित होते. शास्त्रीय मीमांसेनुसार साथ आटोक्यात येण्यासाठी कमीतकमी ७० टक्के लोकसंख्येत सामाजिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली पाहिजे. तसे झाले तर कोरोना संपेल व मानवजात सुरक्षित होईल.
------------
दोन प्रकारे प्रतिकारशक्ती विकसित होते
काही शहरांत झालेल्या सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही आजाराची प्रतिकारशक्ती दोन प्रकारे निर्माण होते. एक म्हणजे त्या आजाराचा संसर्ग झाल्याने आणि दुसरे त्या आजाराचे लसीकरण केल्याने होते. आजार होऊ नये म्हणून जी लस दिली जाते, ती खरेतर ज्या विषाणूने आजार होतो त्याचाच घटक किंवा मृत विषाणू किंवा निष्क्रिय विषाणू मनुष्याच्या शरीरात टाकला जातो. शरीर त्याला शत्रू मानून त्याच्याविरोधात प्रतिकारशक्ती तयार करते.
-------------------
शंकाकुशंका निरर्थकच
जेवढ्या लवकर आपण जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करू, त्या सर्वांमध्ये एकदम प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे. एकदा प्रतिकारशक्ती निर्माण झाली की, हा विषाणू आपले नुकसान करू शकणार नाही. त्यामुळे लसीविषयी कोणतीही शंका मनात न ठेवता ज्या गटासाठीही लस सध्या उपलब्ध केली आहे, त्यांनी हिरीरीने लसीकरण करून घ्यावे व एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक निकम यांनी केले आहे.