मरणाचे भय दाखवून 'न्युट्रिशन शेक' विक्री

By Admin | Updated: April 8, 2016 00:06 IST2016-04-08T00:06:11+5:302016-04-08T00:06:11+5:30

स्थळ शिवटेकडी. वार गुरुवार. वेळ सकाळी ७.३०. वजन मोजण्याच्या यंत्रासमान दिसणारे उपकरण घेऊन काही इसम शिवटेकडीच्या पायथ्याशी दाखल होतात.

Selling 'Nutrition Shake' by showing fear of death | मरणाचे भय दाखवून 'न्युट्रिशन शेक' विक्री

मरणाचे भय दाखवून 'न्युट्रिशन शेक' विक्री

हेल्थ क्लब : जिल्हाभरात सुळसुळाट, तपासणी रस्त्यांवरही
अमरावती : स्थळ शिवटेकडी. वार गुरुवार. वेळ सकाळी ७.३०. वजन मोजण्याच्या यंत्रासमान दिसणारे उपकरण घेऊन काही इसम शिवटेकडीच्या पायथ्याशी दाखल होतात. ये-जा करणाऱ्यांना त्या यंत्रावर उभे राहण्यास सांगून क्षणात 'बॉडी फॅट स्कॅनिंग' रिपोर्ट हाती ठेवतात. शरीर कमालीच्या 'डेंजर झोन'मध्ये गेल्याची धक्कादायक माहिती देतात. हार्ट अटॅक, स्ट्रोक्सच्या दिशेने होणारी ही वाटचाल असल्याचे खुणावतात आणि मग सुरू होतो तो भ्यायलेल्यांना लुटण्याचा गोरखधंदा.
विदेशी कंपनीच्या हर्बल उत्पादनांचा वापर करून 'न्युट्रिशन शेक' विकणारे 'हेल्थ क्लब' शहरातील गल्लीबोळात भूछत्राप्रमाणे उगवले आहेत. ग्रामीण भागातही या 'हेल्थ क्लब'चे जाळे पसरू लागले आहे. असल्या क्लबचे सदस्य झटपट श्रीमंतीच्या नादात चालत्या माणसांनाही घाबरवू लागले आहेत. क्लब स्थापनेमागील मुख्य उद्देशही आकर्षक मिळकत प्राप्त करणे हाच आहे.
लोकांची व्यस्त जीवनशैली आणि त्यामुळे निर्माण होणारा लठ्ठपणा, रक्तचाप, हृदयविकार, मधुमेह, पचनसमस्या आदी मुद्यांचा वापर करून ही मंडळी नागरिकांमध्ये आरोग्याप्रती भय निर्माण करते. 'तुमच्या कुणी ओळखीची व्यक्ती चालता बोलता अचानक दगावल्याचे लक्षात असेल', अशी व्यवसायपूरक आठवण ते करून देताना, शरीर बाहेरून चांगले दिसत असले तरी हृदय, लिव्हर, किडनी, रक्तवाहिन्या यावर फॅट्स वाढल्यामुळे असा अकाली मृत्यू ओढवतो. तुमच्या शरीरात वाढलेल्या फॅट्सचे प्रमाण धोकादायक आहेत. ज्यांच्याकडे उपाय नव्हता ते गेलेत; पण तुम्ही भाग्यवंत आहात. आमच्या 'हेल्थ क्लब'ला या. शेक घ्या. तीन महिन्यांत वजन घटेल. तुमचा पुनर्जन्म होईल, अशी भुरळ या क्लब सदस्यांकडून घातली जाते.
सदस्य क्लबमध्ये यावेत यासाठी फोनद्वारे पाठपुरावा केला जातो. सहसा ही जबाबदारी महिलांना दिली जाते. क्लबला गेलात की, एकवेळच्या शेकसाठी १८० रुपये आकारले जातात. २० दिवस शेक घेणे आवश्यकच असल्याचे सांगितले जाते. कुपन आधीच खरेदी करण्यासाठी कमालीचा तगादा लावला जातो. लठ्ठ व्यक्तिला दोनवेळा शेक घ्यायला सांगितले जाते. एका शेकमागे साधारणत: १०० रुपयांचा नफा क्लबसदस्य कमवितात. दिवसभरात २० सदस्य आलेत तर दोन हजार रुपये आणि ५० सदस्य आलेत तर पाच हजार रुपयांची कमाई होते. सकाळी तीन आणि सायंकाळी दोन तास वेळ दिला की, अशी हजारो रुपयांची कमाई दिवसाला केली जाते. ही कमाई लोकांच्या मृत्यूभयावर आधारित असल्याने आहारशास्त्र वा वैद्यकशास्त्राच्या अधिकृत शिक्षणाशिवायदेखील सामान्यजनांचे खिसे रोज रिते केले जातात.

Web Title: Selling 'Nutrition Shake' by showing fear of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.