वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री
By Admin | Updated: July 5, 2016 00:31 IST2016-07-05T00:31:29+5:302016-07-05T00:31:29+5:30
सणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.

वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री
एफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
संजय खासबागे वरुड
सणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ खाण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यापर्यंत भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकले जातात. यामुळे अंगावर पूरळ येणे यासह त्वचेचे आजार वाढत आहेत. सणासुदीच्या दिवसांत तेलामध्ये पामोलीन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तेल गोठायला सुरुवात होते. हा प्रकार अलीकडे उघडकीस येत आहे. इतकेच नव्हे तर तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, तसेच गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ केली जात आहे.
रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागला आहे. अन्न, औषधी प्रशासन विभागाने एखाद्या दुकानावर धाड टाकलीच तर नमुने बदलून तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामुळे दुकानदारावर कारवाई होत नाही. तालुक्यात तेलमाफीयांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अभय असल्याने ‘कुणीही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही’, अशी त्यांची धारणा झाली आहे.
अन्नात भेसळ करणाऱ्यांवर होणार का कारवाई ?
जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन ग्राहकांची लूट होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे अधिकारी याकडे लक्ष देतील की वेळ मारून नेतील, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ गरिबांच्या माथी मारून अनेकांना आजाराने जडले आहे. वारंवार याबाबत चर्चा होत असून प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे.
खाद्यपदार्थांमध्ये, धान्यामध्ये, तेलामध्ये भेसळीबाबतच्या तक्रारी आल्यास कारवाई केली जाते. या पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविल्या जातात. इतकेच नव्हे तर प्रकरण न्यायालयासमक्ष ठेवले जाते. परंतु अद्याप तालुक्यातून अशी तक्रार आलेली नाही.
- नीलेश ताथोड,
अन्न,पुरवठा अधिकारी, अमरावती