अपक्षांचा बोलबाला
By Admin | Updated: July 22, 2014 23:46 IST2014-07-22T23:46:15+5:302014-07-22T23:46:15+5:30
जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये नगराध्यक्ष व नऊ पालिकांमध्ये उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या चार नगराध्यक्षांच्या निवडीवर औपचारीक

अपक्षांचा बोलबाला
नगराध्यक्ष निवडणूक : सात पैकी चार महिला; दोन ठिकाणी स्थगनादेश
अमरावती : जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये नगराध्यक्ष व नऊ पालिकांमध्ये उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या चार नगराध्यक्षांच्या निवडीवर औपचारीक शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्ह्यात काँग्रेसचे २, जनसंग्रामचे २, प्रहारचा १, भाजपचा १ व एक अपक्ष नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्षांमध्ये अंजली अग्रवाल (चांदूररेल्वे- काँग्रेस), सरिता खेरडे (शेंदुरजनाघाट- विदर्भ जनसंग्राम), हनिफाबी मो. शरीफ (अंजनगाव सुर्जी-काँग्रेस), रवींद्र थोरात (वरूड - विदर्भ जनसंग्राम), रंगलाल नंदवंशी (अचलपूर- अपक्ष), अर्चना राऊत (धामणगाव रेल्वे -भाजप) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील चिखलदरा वगळता इतर पालिकांमध्ये २२ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. मोर्शी आणि दर्यापूर पालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगनादेश आल्याने इतर सात पालिकांमध्ये नगराध्यक्षांसाठी मतदान घेण्यात आले. त्यापैकी चांदूरबाजार, वरूड, अचलपूर, धामणगाव (रेल्वे) पालिकांमध्ये नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरीत तीन चांदूररेल्वे, शेंदुरजना घाट व अंजनगावसुर्जी पालिकांमध्येच नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदान झाले. मोर्शी आणि दर्यापूर नगरपरिषदेत केवळ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. दर्यापूर पालिकेतील स्वीकृत सदस्याच्या निधनामुळे रिक्त असलेल्या पदासाठी देखील मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.
धामणगावात अर्चना राऊत नगराध्यक्ष
धामणगाव (रेल्वे) : धामणगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी आज भाजपाचे नगरसेवक हेमकरण कांकरीया हे १३ मतांनी विजयी झाले तर प्रतीस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराला चार मते मिळाली. या पूर्वीच अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चना राऊत अविरोध निवडून आल्या. यावेळी भाजपाच्या वतीने हेमकरण कांकरीया व कॉंग्रेस तर्फे मोहमद ईब्राहीम शेख मेहमुद यांनी नामांकन दाखल केले़ यावेळी झालेल्या निवडणुकीत कांकरीया यांना १३ मते मिळाली. तर शेख मेहेमूद यांना ४ मते मिळाली. यापूर्वीच भाजपाच्या अर्चना राऊत यांची अविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली आहे़