सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात तीन शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:14+5:302021-04-10T04:13:14+5:30
अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा ...

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात तीन शाळांची निवड
अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तीन शाळांची निवड केली आहे.
राज्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील अतिमागास गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा निर्मितीच्या परिपत्रकानुसार राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. शासनाच्या या उपक्रमाला पूरक उपक्रम म्हणून सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान २ व कमाल ३ जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण व्हीएसटीएफने स्वीकारले आहे. याअंतर्गत पुढील एक वर्षात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली आर, धारणीतील बेरदाबर्डा व चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी या शाळेत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील चर्चेनुसार बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार व्हीएसटीएफच्या पाच तालुक्यांतील झेडपीच्या प्राथमिक शाळांचे पटसंख्येवर आधारित निकषानुसार पात्र शाळांची तपासणी करून याचा अहवाल १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला होता. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अहवाल, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार तसेच जिल्हा अभियान परिषदव्दारा पात्र शाळांची निवड करण्यात आली आहे. यात जामली आर, बेरदाबर्डा, विश्राेळी या शाळांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी, सीईओकडून शिक्कामोर्तब
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत व्हीएसटीएफच्या गावातील आदर्श शाळेसाठी पात्र ठरलेल्या वरील तीनही शाळांच्या निवडीवर अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अभियान परिषदेचे उपाध्यक्ष तथा झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी अविशांत पांडा आदींनी शिक्कामोर्तब केले.