निवड प्रक्रियेवर शिक्कामोर्तब ?
By Admin | Updated: January 8, 2016 00:31 IST2016-01-08T00:31:39+5:302016-01-08T00:31:39+5:30
मागील वर्षभरापासून जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या निवड प्रक्रियेचा वाद आता सुटण्याची शक्यता बळावली आहे.

निवड प्रक्रियेवर शिक्कामोर्तब ?
जिल्हा परिषद विषय समिती : १२ जानेवारीच्या सभेत होणार घोषणा
अमरावती : मागील वर्षभरापासून जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या निवड प्रक्रियेचा वाद आता सुटण्याची शक्यता बळावली आहे. या प्रक्रियेबाबत सध्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बैठकांची श्रृंखला जोरात सुरू आहे. यामध्ये कुणाला कुठली समिती द्यायची याबाबत खल सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या १२ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब करण्याची रणनीती ठरविण्यात आली. केवळ सभेत घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या जलव्यवस्थापन, कृषी, समाज कल्याण, शिक्षण आणि पशुसंवर्धन या समितीमध्ये एकूण १७ जागा शिल्लक आहेत. मात्र रिक्त जागांपेक्षा अधिक जिल्हा परिषद सदस्यांनी यासाठी दावेदारी केल्याने यात प्रेचप्रसंग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ८१(१) नुसार ज्याही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापतीना विषय समितीवर प्रतिनिधीत्व देणे अनिवार्य आहे. मात्र जिल्हा परिषदेत मावळते पदाधिकारी असलेल्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सभापती मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने या पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, नीता जिचकार, सुनीता वानखडे, दयाराम काळे व अन्य सभापतींना विषय समितीवर प्राधान्याने संधी द्यावी लागणार आहे. अशा पदाधिकाऱ्यांची संख्या १२ आहे. त्यानंतर उर्वरित विषय समितीवर कुणाला संधी द्यायची यासाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रानुसार ही निवड प्रक्रिया विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्हा परिषद पदाधिकारी व पंचायत समितीचे सभापती यांचे लक्ष लागले आहे.
या समितीवर वर्णी
लागण्याची शक्यता !
जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या विषय समितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानुसार स्थायी समितीत रिक्त असलेल्या एका जागेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रवीण घुईखेडकर, मनोहर सुने यांचे अर्ज आले आहेत. यामध्ये प्रवीण घुईखेडकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जलव्यवस्थापन समितीमध्येसुध्दा १ जागा महिलेकरिता रिक्त आहे. यासाठी सुरेखा ठाकरे, विद्या तट्टे यांचा अर्ज आहेत. यापैकी तट्टे यांच्याकडे समिती असल्याने सुरेखा ठाकरे यांची जलव्यवस्थापन समितीवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. कृषी समितीच्या चार रिक्त जागांसाठी पाच अर्ज आहेत. यामध्ये अंजनगाव पंचायत समितीचे सभापती विनोद टेकाडे, नीता जिचकार, सोनाली देशमुख, शोभा इंगोले व जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी यांचा समावेश आहे. यामध्ये सुधिर सुर्यवंशी, शोभा इंगोले यांच्याकडे समिती असल्याने याचा पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे विनोद टेकाडे, नीता जिचकार, सोनाली देशमुख यांची कृषी समितीवर निवड निश्चित मानली जात आहे. समाज कल्याण समितीमध्ये चार जागा रिक्त आहेत. यासाठी अभिजित ढेपे, वनमाला खडके, आशिष धर्माळे, सुनिता वानखडे, संगिता सवई,याचा समावेश आहे. यापैकी अभिजित ढेपे, वनमाला खडके, संगिता सवई,याचा पत्ता कट होऊन आशिष धर्माळे, सुनिता वानखडे यांना संधी मिळणार आहे. उर्वरित एका जागेवर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण सिमितीमध्ये ३ जागा रिक्त आहेत. यासाठी मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, दयाराम काळे, श्रीपाल पाल आदींचे अर्ज आले आहेत. यामध्ये श्रीपाल पाल यांचा पत्ता कट होऊन शिक्षण समितीवर इतर तिघांची वर्णी लागण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे पशुसंवर्धन समितीमध्ये चार रिक्त जागांवर नवनिर्वाचित पंचायत समितची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)