खुल्या जागेवरील वाळुसाठा जप्त
By Admin | Updated: March 3, 2017 00:21 IST2017-03-03T00:21:31+5:302017-03-03T00:21:31+5:30
महानगरात खुल्या जागेवर ठेवलेल्या अवैध वाळू साठ्यांवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी धाडसत्र

खुल्या जागेवरील वाळुसाठा जप्त
महसूल विभागाची कारवाई : भरारी पथकाचे २९ अड्ड्यांवर धाडसत्र
अमरावती : महानगरात खुल्या जागेवर ठेवलेल्या अवैध वाळू साठ्यांवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी धाडसत्र राबवून १५ लाख रूपये किमतीची वाळू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
‘लोकमत’मध्ये गुरूवार २ मार्च रोजी ‘वाळू साठवण जोरात’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. महानगरात अवैध वाळू वाहतूक, विक्री व साठवण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव यावृत्ताद्वारे मांडण्यात आले. त्यानंतर गुरूवारी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनात तीन भरारी पथकांनी वाळू साठवणुकीच्या एकूण २९ अड्ड्यांवर धाडसत्र राबविले. दरम्यान एकाचवेळी शेकडो ट्रक वाळुची साठवणूक ्रकेल्याचे वास्तव महसूल विभागाच्या निदर्शनात आले. भरारी पथकाने पंचनामा, जप्तीनामा करून ती वाळू ताब्यात घेतली आहे. वडाळी परिसरासह तारखेडा, बडनेरा, रहाटगाव, नवसारी याभागात खुल्या जागेवरील वाळूअड्ड्यांवर धाडसत्र राबविले.
वाळूमालकांवर होणार फौजदारी
खुल्या जागेवर नियमबाह्य वाळू साठवण करणाऱ्या मालकांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वाळू साठ्याच्या मालकांची नावे शोधून पोलिसांत फौजदारीसाठी तक्रार दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.