६० हजार गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 11, 2014 22:48 IST2014-05-11T22:48:11+5:302014-05-11T22:48:11+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या आणखी ६० हजारांहून अधिक शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

६० हजार गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा
अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या आणखी ६० हजारांहून अधिक शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने तातडीने मदत मिळण्याच्या शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मदतीसाठी जिल्ह्यात आणखी ७० कोटी रुपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात रबी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. पिके व फळबागाना शासनाने भरपाई मंजुरी केली. जिल्ह्यात या संकटामुळे शेतकर्यांचे सुमारे १४० कोटी रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ८३८ शेतकर्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. त्यापैकी काही शेतकर्यांना निधी वितरित झाला असला तरी बहुतांश शेतकर्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्याला दोन टप्प्यात ७२ कोटी रुपयांची मदत केली. यात सर्वाधिक निधीचे वाटप धामणगाव तालुक्यातील गारपीटग्रस्तांना झाले आहे. आणखी यामध्ये सुमारे ७० कोेटींची रक्कम जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी प्राप्त होताच उर्वरित शेतकर्यांना मदत निधीचे वाटप सुरु केले जाणार असल्याचे महसुल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)