९० टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांचा ठेंगा
By Admin | Updated: November 13, 2014 22:55 IST2014-11-13T22:55:25+5:302014-11-13T22:55:25+5:30
जिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे

९० टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांचा ठेंगा
निकृष्ट सोयाबीन बियाणे : कृषी खात्याच्या आदेशाला केराची टोपली
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे उर्वरित तक्रारंविषयी बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवल्याची माहिती आहे. यामध्ये शासनाच्या महाबीजसह १५ कंपन्याचा सहभाग आहे.
जिल्ह्यात खरीप पिकाखाली किमान ७ लाख हेक्टर क्षेत्र होते. यापैकी नगदी पीक म्हणून अनेकांनी सोयाबीनला पसंती दिली. यंदाच्या हंगामात उशिरा पाऊस, पावसातील खंड यामुळे पेरणीला दीड महिना उशीर झाला. यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेले नामांकित कंपन्यांचेही उगवणशक्ती नसलेले बियाणे निकृष्ट निघाले. त्यामुळे ५० टक्केच उगवण झाली. परिणामी रोपांची संख्या कमी व रोगाचा प्रादुर्भाव अधिक यामुळे सरासरी उत्पन्नात मोठी घट आली.
बियाणे न उगविल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात. कृषी विभागाच्यावतीने क्षेत्रीय पाहणी तक्रार निवारण समितीद्वारा करण्यात आली. न उगवलेल्या बियाण्यांचा पंचनामा करण्यात आला. पाहणीच्या वेळी बहुतांश ठिकाणी निकृष्ट बियाणे असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणे बदलून किंवा बियाण्यांचा परतावा देण्याचे आदेश कृषी विभागाने बजावले. काही कंपन्यांनी बियाणे बदलून देण्यास नकार देण्यात आल्याने कृषी विभागाने नोटीसही बजावली. परंतु फक्त ७८ शेतकऱ्यांना मदत मिळाली.