सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान ऊर्जा बचतीला प्राधान्य
By Admin | Updated: May 2, 2015 00:21 IST2015-05-02T00:21:51+5:302015-05-02T00:21:51+5:30
राज्यात पाच शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे.

सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान ऊर्जा बचतीला प्राधान्य
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव : ऐतिहासिक वास्तुंचे जतन, शहर होणार झोपडपट्टीमुक्त
अमरावती : राज्यात पाच शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे. यात अमरावती शहराला स्थान मिळाले असून स्मार्ट सिटीत सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जा बचतीला प्राधान्य, ऐतिहासिक वास्तुंचे जतन, झोपडपट्टीमुक्त शहर आदी बाबींना प्राधान्य देत यापूर्वीच महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे आता मुंबई, पुणेच्या धर्तीवर अमरावती शहराचा विकास होईल, हे वास्तव आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती या पाच शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा संकल्प केला आहे. त्याकरिता इस्त्रायलमधील तेल अविव शहरांचे सहकार्य मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेल अविवचे महापौर रान हुल्दाई यांच्याशी संयुक्त भागिदारीबाबत चर्चादेखील केली आहे. शहरांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी तंत्रज्ञान, समाज माध्यमे, लोकसहभाग आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे.
तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून अमरावती शहराचा स्मार्ट सिटीत सहभाग व्हावा, यासाठी काही महिन्यांपूर्वी आवश्यक बाबींची पूर्तता करुन तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. यामध्ये शहरातील अंबादेवी व एकवीरा देवी मंदिराचे जतन, ऐतिहासिक परकोट, अॅकॅडमिक हायस्कूल, मध्यवर्ती कारागृह, नेहरु मैदान शाळा, व्हीएमव्ही कॉलेज यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रातील घोषित १०२ झोपडपट्ट्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सुसज्ज वाहतूक व्यवस्था, उद्यान, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, दळणवळण, चांगल्या दर्जाचे शिक्षण, पार्किंग, फूटपाथ, आपत्कालीन व्यवस्थापन, खुल्या जागेचे सौदर्र्यींकरण, औद्योगिकरण, ई- गव्हर्नसच्या वापर करुन प्रशासन गतीमान करणे, अत्याधुनिक बसस्थानक, नियोजनबद्ध परिवहन सेवा, ट्रक टर्मिनल, मासोळी हब, नवीन नऊ उड्डाण पुलाची निर्मिती, क्रीडा संकुलाची निर्मिती, नाल्यातील पाण्याचा पुनर्वापर, स्माशन भूमीचा विकास, अद्ययावत कत्तलखान्याची निर्मिती, आरोग्य सुविधा, ईको- टुरिझम, विज्ञान केंद्र, चांगल्या दर्जाच्या इमारतींचे निर्माण कार्य, सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींचा समावेश करुन प्रस्ताव पाठविला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी अमरावती शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्याचे दिसून येते. हा प्रस्ताव संदीप देशमुख या त्रयस्त एजंसीने तयार केला आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचे सकारात्मक पाऊल
अमरावती शहराचा स्मार्ट शिटीत समावेश व्हावा, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रशासन स्तरावर अनेकदा बैठकी घेतल्या. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या दालनात स्वतंत्रपणे बैठक घेऊन स्मार्ट सिटीत आवश्यक त्या बाबींचा समावेश करण्यासाठी सकारात्मक पाऊल यांंनी उचलला आहे.