जिल्हाभरात एक हजार महिलांच्याच नावे सातबारा
By Admin | Updated: August 31, 2014 23:30 IST2014-08-31T23:30:40+5:302014-08-31T23:30:40+5:30
मुलगी ही दोन्ही घरची लक्ष्मी. तिच्यामुळे दोन्ही घरात ऐश्वर्य नांदते. परंतु या मुलीला गर्भातच नष्ट करण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी शासनाने महिलांच्या नावे सातबारा करण्याचे आदेश एक वर्षापूर्वी

जिल्हाभरात एक हजार महिलांच्याच नावे सातबारा
मोहन राऊत - अमरावती
मुलगी ही दोन्ही घरची लक्ष्मी. तिच्यामुळे दोन्ही घरात ऐश्वर्य नांदते. परंतु या मुलीला गर्भातच नष्ट करण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी शासनाने महिलांच्या नावे सातबारा करण्याचे आदेश एक वर्षापूर्वी दिले़ परंतु या आदेशाचे जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. दोन वर्षांत केवळ एक हजार महिलांच्या नावाने सातबारा करण्यात आला आहे़
राज्य शासनाने एक वर्षापूर्वी शासकीय अध्यादेश काढून सातबारावर कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या नावाची नोंद करावी, असे स्पष्ट आदेश दिले होते़
मालमत्तेसाठी कोणताही वाद होऊ नये. महिलांना सर्व बाबीत समान अधिकार मिळावा, कुटुंबात मानाचे स्थान असलेल्या महिलांना संपत्तीतही बरोबरीने न्याय मिळावा, सबलीकरणासाठी हातभार लागून व्यसनाधीन तसेच विविध कारणाने होणारे परस्पर शेत जमिनीचे व्यवहार थांबविता येईल, अशी सामाजिक भावना जोपासत उदात्त हेतूने सातबारावर कुटुंबप्रमुख महिलांचे नाव टाकण्याचा हा उपक्रम राबविण्यामागचा हेतू होता़ परंतु या आदेशाचे पालन जनजागृतीमुळे मागे पडले आहे़ जिल्ह्यातील केवळ अचलपूर, धामणगाव, वरूड या तालुक्यात हा उपक्रम काहीअंशी राबविण्यात आला़ आतापावेतो शेत जमिनीचे मालक म्हणून एक हजार महिलांच्या नावाची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे़
शासनाच्यावतीने एकीकडे महिलांचा सन्मान करण्यासाठी जन्मानंतर प्रत्येक मुलींच्या नावे एक वर्षाच्या आत २१ हजार रूपये गुंतविणे, १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला १ लाख रूपये मिळवून देणे, दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटुंबातील दोन मुलींना विविध योजनांचा लाभ देणे, पहिली ते बारावी पर्यंतच्या मोफत शिक्षणाबरोबरच या मुलींना नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती प्राप्त करून देणे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मदत करणे, अशा विविध योजना राबविताना दुसरीकडे कुटुंबप्रमुख म्हणून सातबारावर महिलांचे नाव चढविण्यास होणाऱ्या विलंबामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़