दर्यापूर येथील हंगामी सेवकाने राष्ट्रपतींना मागितली इच्छामरणाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:30 IST2018-09-28T01:30:31+5:302018-09-28T01:30:44+5:30
पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते.

दर्यापूर येथील हंगामी सेवकाने राष्ट्रपतींना मागितली इच्छामरणाची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते. अशा पराकोटीच्या विवशतेला कंटाळून दर्यापूर येथील एका व्यक्तीने राष्ट्रपतींकडे निवेदनातून आपली विवशता मांडली असून, इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
दर्यापुरातील खोलापुरी गेटस्थित जानराव राजगुरे हे १९७९ ते २००२ पर्यंत कापूस उत्पादक पणन महासंघात हंगामी सेवक म्हणून कार्यरत होते. शासनाने अचानक २००२ मध्ये कापूस खरेदी बंद केली. कार्यरत हंगामी सेवकांना कोणताही मोबदला दिला नाही. जानराव राजगुरे यांनी थातूरमातूर खाजगी कामे करून आपला संसाराचा गाडा चालवण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैव त्यांच्या कच्छपी लागले. आधीच त्यांचा मुलगा २५ वर्षांपासून ९० टक्के अपंग आहे. दुसरीकडे पत्नीला आठ वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने अपंगत्व आले. दोघांचे सारे जागीच करावे लागत असल्याने जानराव राजगुरे यांना त्यांच्या दिमतीला राहावे लागते. मुलासाठी मंजूर झालेल्या ६१४ रुपयांमध्ये दोघांच्या औषधासह घरामध्ये खाण्यापिण्यासाठी साहित्य आणावे लागते. नातेवाइकांसह मित्रमंडळींनी आजवर मदत केली; परंतु, दरवेळी त्यांच्यापुढे हात पसरण्याची वेळ येऊ न देण्यासाठी इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जानराव राजगुरे यांनी केली आहे.
राष्ट्रपतींना निवेदन
जानराव राजगुरे यांनी राष्ट्रपतींसह राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पत्रातून आपल्या वेदना कळविल्या आहेत.