बेलोरा विमानतळाच्या विकासावर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: March 8, 2017 00:06 IST2017-03-08T00:06:26+5:302017-03-08T00:06:26+5:30
बेलोरा विमानतळाचा विकास करण्याबाबत राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याकरिता १२५ कोेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

बेलोरा विमानतळाच्या विकासावर शिक्कामोर्तब
१२५ कोटींची तरतूद : आॅगस्ट २०१६ मध्ये पाठविलेला प्रस्ताव मंजूर
अमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास करण्याबाबत राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याकरिता १२५ कोेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणात कोल्हापूरसह १० विमानतळांच्या यादीत बेलोरा विमानतळाचा विकास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बेलोरा विमानतळ हे जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, आ.वीरेंद्र जगताप, आ.रवि राणा आदी लोकप्रतिनिधींनी या विमानतळाच्या चौफेर विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने मे २०१६ मध्ये बेलोरा विमानतळाची पाहणी केली होती. बेलोरा विमानतळाचा विकास करताना येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणीदेखील केली होती. परंतु आता शासनाने बेलोरा विमानतळाचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे धावपट्टीत वाढ करताना १३७२ वरून १८५० मीटर लांबीची बनविली जाईल. अद्ययावत टर्मिनल इमारत, नवीन जलकुंभ, विश्रामगृह, नवीन इमारत, नाईट लँडिंगची व्यवस्था, विमानतळाला संरक्षण भिंत, सुसज्ज एटीएस टॉवर आदी विमान सेवेसाठी लागणाऱ्या बाबीची पूर्तता केली जाईल. मजीप्राच्या बडनेरा येथील जलकुंभावरून विमानतळपर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. केवळ ही जलवाहिनी जलकुंभाला जोडण्याचे काम बाकी आहे. तसेच जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. लांबीचा वळण मार्ग डांबरीकरणाने तयार होत आहे.
२८३ हेक्टर
जमीन अधिग्रहित
अमरावती : हा वळण मार्ग पूर्णत्वास आल्यास यवतमाळ मार्गावरील वाहतूक बंद केली जाईल. यवतमाळ मार्गे ये-जा करणाऱ्या वाहनांना अकोला मार्गावरून बेलोरा वळण मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणासाठी २८३ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांनी सामान्य प्रशासन एव्हिऐशन सचिवांना विमानतळाच्या विकासासाठी यापूर्वी पाठविलेल्या ७७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाऐवजी १२५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाचा विकास होईल, यात दुमत नाही. (प्रतिनिधी)
अमरावतीहून विमानसेवा सुरू झाली पाहिजे, यासाठी बेलोरा विमानतळाच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अर्थसंकल्पात १२५ कोटींची तरतूद झाल्याने विमानतळाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री
बेलोरा विमानतळाचा विकास व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक उपक्रम समितीने दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार राज्य शासनाकडे अहवाल सादर केला. आता विमानतळाच्या विकासासह ७२ आसनी विमान सेवा सुरू होईल.
- सुनील देशमुख,
आमदार, अमरावती