शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:24 IST2021-02-28T04:24:11+5:302021-02-28T04:24:11+5:30
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १ ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात ...

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम स्थगित
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १ ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही मोहीम परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
शाळाबाह्य शोधमोहिमेत विविध विभागाच्या समन्वयातून विविध वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवून जिल्ह्यातील एकही शाळाबाह्य किंवा स्थलांतरित मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या अनुषंगाने ही मोहीम राबविली जाणार होती. मोहिमेंतर्गत ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाही तसेच खासगी बालवाडी इंग्रजी माध्यमांची ज्युनिअर केजी सिनिअर केजीमध्ये जात नाहीत व ७ ते १७ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध समित्यांचे गठण करावयाचे आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी व सीईओंकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर त्यांनी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम कोरोनामुळे पुढे ढकण्याची सूचना दिली. समिती गठणाबाबतही कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ही मोहीम तूर्तास आदेशानुसार स्थगित केली आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड खान यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे शुक्रवारी शिक्षणमंत्री यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉफ्रंसिंगमध्ये शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्याची प्रक्रिया सध्या पुढे ढकण्याची विनंती केली असता त्यांनीही स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मोहीम राबविण्यास हरकत नसल्याचे व्हीसी दरम्यान सांगितल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, १ मार्चपासून राबविण्यात येणारी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम जिल्हाधिकारी व सीईओंच्या आदेशानुसार तूर्तास स्थगित केली आहे. याबाबत पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली जाईल.
- ई.झेड खान,
प्राथमिक शिक्षणाधिकारी