बडनेऱ्यात तीन मशिदींचा परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:50+5:30
वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आणि तबलिगी जमातच्या मरकजमधून परतलेल्या या व्यक्तीचे बडनेऱ्यातील जामा मशीद, अलमासनगर व चमननगरातील मशिदीमध्ये २२ ते २८ एप्रिल या कालावधीत वास्तव्य होते. या तिन्ही मशिदींमध्ये प्रत्येकी दोन दिवस वास्तव्य होते. या व्यक्तीसोबत पातूर येथील अन्य १३ जणसुद्धा होते. २८ मार्चला हे सर्व वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले.

बडनेऱ्यात तीन मशिदींचा परिसर सील
श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : वाशिम जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने बडनेऱ्यातील तीन मशिदींमध्ये सहा दिवस मुक्काम केल्याचे ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे या तिन्ही मशिदींचा परिसर पोलिसांकडून शनिवारी बॅरिकेडिंग करून सील करण्यात आला. सकाळपासून या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. संपर्कातील दहा लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आणि तबलिगी जमातच्या मरकजमधून परतलेल्या या व्यक्तीचे बडनेऱ्यातील जामा मशीद, अलमासनगर व चमननगरातील मशिदीमध्ये २२ ते २८ एप्रिल या कालावधीत वास्तव्य होते. या तिन्ही मशिदींमध्ये प्रत्येकी दोन दिवस वास्तव्य होते. या व्यक्तीसोबत पातूर येथील अन्य १३ जणसुद्धा होते. २८ मार्चला हे सर्व वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले. यातील एक व्यक्ती वाशिमला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती शुक्रवारी दुपारी जिल्हा प्रशासनास मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात जर कुणी आले असेल तर त्यांनी समोर येऊन सहकार्य करावे, असे आवाहन बडनेरा पोलीस व महापालिका प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत बडनेरा पोलीस व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे संपर्कात आलेल्या दहा लोकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी पाठविले. त्यांचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील बाधित व्यक्तीचे सहा दिवस बडनेºयात वास्तव्य होते. खबरदारी म्हणून परिसर बॅरिकेडिंगने सील करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाने स्थितीवर लक्ष देत आहोत.
- पंजाब वंजारी
पोलीस निरीक्षक, बडनेरा.
कोरोनाग्रस्त वास्तव्यास असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. शनिवारी हा परिसर सॅनिटाइज करण्यात आला. संपूर्ण झोन परिसरातच फवारणी केली जात आहे.
- विशाखा मोटघरे
सहायक आयुक्त, महापालिका
नमुन्यांचा अहवाल आज मिळणार
बाधिताच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींचा थ्रोट स्वॅब अहवाल ५ एप्रिल रोजी प्राप्त होईल, असा अंदाज वैद्यकीय अधिकारी वैशाली मोटघरे यांनी व्यक्त केला. दहाही लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले. सील केलल्या मशिदींच्या परिसरात आशा वर्कर, आरोग्य सेविकांची तीन पथके तपासणीची कामे करीत आहेत.