बचत गटाच्या दुकानांना सील
By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T23:35:05+5:302014-08-13T23:35:05+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सायंस्कोर मैदान येथे बचत गटाच्या माल विक्री केंद्रासाठी चार गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामीण भागातून विविध महिला बचतगटांना त्यांनी

बचत गटाच्या दुकानांना सील
डीआरडीएची कारवाई : ११ वर्षांपासून होते बचत गटाचे विक्री केंद्र
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सायंस्कोर मैदान येथे बचत गटाच्या माल विक्री केंद्रासाठी चार गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामीण भागातून विविध महिला बचतगटांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात आले होते. दरम्यान करार संपल्यानंतरही गाळे रिकामे न केल्यामुळे या विक्री केंद्राला सील ठोकण्यात आले आहे. प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप बचत गट केंद्र चालकांनी केला आहे.
सायंस्कोर मैदानालगत असलेल्या जिल्हा परिषद वसाहतीच्या बाजूने ४ बचतगटाच्या उत्पादित माल विक्रीसाठी गाळे बांधले होते. सदर गाळे महिला व पुरुष बचत गटांना प्रतिमाह २५० रुपये भाडे तत्त्वावर सन २००९ मध्ये ११ महिन्यांच्या करारावर दिले होते. यात शिल्पकार पुरुष बचत गट (दाढी), सिद्धिविनायक महिला बचतगट (हरताळा) व अन्य दोन बचत गटांचा समावेश होता. ११ महिन्यांच्या करारानंतर गाळे प्रशासनाने विहित मुदतीत रिकामे करणे आवश्यक होते. मात्र आता पर्यंत या बचतगटांना केवळ नोटीशी बजाविण्यात आल्या. मात्र त्यापुढे कुठलीही कारवाई प्रशासनाने केली नाही. परिणामी बचतगट चालकांनी आपली बाजू प्रत्येकवेळी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात कळविले असल्याचे बचतगट संचालकांचे म्हणणे आहे. अचानकच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने नियामक मंडळाच्या बैठकीत हे गाळे रिकामे करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सायंस्कोर मैदानालगतचे गाळे बचत गटांनी खाली न केल्यामुळे मंगळवारी या प्रतिष्ठानांना सील ठोकले आहेत. ही कारवाई जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशावरून प्रकल्प संचालक के.एम. अहमद, गटविकास अधिकारी प्रमोद कापडे, नरेंद्र धारगे व डीआरडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बचत गटांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. एकीकडे शासनाने बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. बचत गटांच्या उत्पादित माल विकता यावा यासाठी विविध ठिकाणी गाळे बांधण्यात आले. त्यानुसार सायन्सस्कोअर मैदानालगतचे गाळे बचत गटांनी भाडे तत्वावर घेतले होते. आतापर्यत या ठिकाणी बचत गट विक्री केंद्रांच्या माध्यमातून मिळालेल्या रोजगारावर कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते. (प्रतिनिधी)