स्क्रब टायफसचा उद्रेक शीघ्र प्रतिसाद पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:15 IST2018-08-31T22:15:04+5:302018-08-31T22:15:35+5:30
स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (साथरोग), निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका) यांचा समावेश असलेले शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. नावाडे यांनी दिले आहेत.

स्क्रब टायफसचा उद्रेक शीघ्र प्रतिसाद पथक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (साथरोग), निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका) यांचा समावेश असलेले शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. नावाडे यांनी दिले आहेत.
आरोग्य सेवा हिवताप अकोल्याचे सहसंचालक डॉ. अभिनव भुते हे चमूचे प्रमुख असतील. त्यांच्या नेतृत्वात शीघ्र प्रतिसाद पथक स्क्रब टायफसने मृत्यू पावलेले रुग्ण दाखल असलेल्या आरोग्य संस्थेस भेट देईल. संंबंधित रुग्णाच्या औषधपचाराचा सर्व लेखाजोखा, त्या रुग्णात आढळून आलेली लक्षणे, निदान करण्यासाठी तपासण्या यांचा अभ्यास या पथकाला करावा लागणार आहे.
नागपूरमध्ये स्क्रब टायफसने पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावती जिल्ह्यातही अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने डॉ. नावाडे यांनी स्क्रब टायफसच्या प्रतिबंधासाठी अधिनस्थ आरोग्य यंत्रणेला लेखी निर्देश दिले. या आजाराचे पाच रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. त्यापैकी दोघे शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल आहेत. अमरावतीत स्क्रब टायफसची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश उपसंचालकांनी दिले आहेत.
यांच्या नावे आदेश
सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) अकोला. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, अमरावती, अकोला महापालिका.
उपाययोजनांचे निर्देश
ताप रुग्ण सर्वेक्षण, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, निदान व उपचार, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण आणि आरोग्य शिक्षण याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. उमेश नावाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेला दिले आहेत.